कडेगावच्या मोहरमची तयारी
By admin | Published: October 18, 2015 11:05 PM2015-10-18T23:05:41+5:302015-10-18T23:47:39+5:30
दोनशे वर्षांची परंपरा : ताबूत बांधणीस वेग; २४ पासून सोहळा
प्रताप महाडिक --कडेगाव दोनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला व हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम ताबूत (डोले) भेटीचा सोहळा शनिवार दि. २४ रोजी दुपारी एक वाजता होत आहे. त्यानिमित्ताने ताबूत बांधणीला वेग आला आहे.
मोहरमच्यानिमित्ताने कडेगावमध्ये दीडशे ते दोनशे फूट उंचीचे ताबूत तयार केले जातात. बकरी ईदनंतर मोहरमच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांची बैठक होते आणि त्यानंतर महिन्याभरातच ताबुताची बांधणी होते. अष्टकोनी आकाराचे मजले तयार करून त्याला लाल, हिरवा कागद व बेगड लावून हुंड्या, झुंबर, नारळाच्या तोरणाने ताबूत सुशोभित करून, एकावर एक मजले तयार केले जातात. ही बांधणी करताना कुठेच गाठ दिली जात नाही. या मोहरमच्या निमित्ताने १४ ताबूत बसविले जातात. यापैकी निम्मे ताबूत हे हिंदूंचे असतात.
ताबूत भेटीनंतर तिसऱ्या दिवशी (जियारत) होऊन मोहरमची सांगता होते. अशा या ताबुतांची बांधणी हिंदू-मुस्लिम बांधव खांद्याला खांदा लावून करतात आणि ताबूत उचलण्याचा पहिला मानही हिंदूंनाच दिला जातो. म्हणूनच देशमुख, कुलकर्णी, देशपांडे, शेटे, शिंदे, सुतार, वाळिंबे यांना हा मान दिला जातो.
या उत्सवाच्या निमित्ताने देशभर सामाजिक ताण-तणाव निर्माण होत असताना कडेगावमध्ये मात्र हिंदू-मुस्लिम बांधव सामाजिक सलोख्याचा आदर्श साऱ्या समाजासमोर घालून देत आहेत. मोहरमच्या सणासाठी संपूर्ण राज्यभरातून भाविक येत असतात. यानिमित्ताने तयारीला वेग आला आहे.
ऐक्याचा संदेश
मोहरमची सुरूवातच चंद्रदर्शनाने होते. चंद्रदर्शनानंतर कुदळ मारली जाते. मोहरमला तारीख ५ रोजी सर्वजण मशिदीत जाऊन हजरत इमाम हुसेनच्या नावाने हातात अट्टी दोरा बांधून फकीर होतात. कुदळ मारल्यानंतर दहा दिवस मांसाहार वर्ज्य केला जातो. ९ रोजी मोहरम उभे केले जातात व १0 रोजी ताबुतांच्या मिरवणुका व भेटीचा सोहळा साजरा होतो. ‘प्यारा प्यारा हमारा देश प्यारा अब एकी का कर कर दो पुकारा, हिंदू-मुस्लिम ऐक्य रहेंगे एकी से सागर पार क रेंगे, अब एकी का ले लो सहारा’ असा ऐक्याच्या गीतातून एकतेचा संदेश दिला जातो.
हिंदू-मुस्लिम सलोखा
थोर संत साहेब हुसेन पीरजादे हिंदू-मुस्लिम ऐक्य घडविण्यासाठी त्यांनी मोहरममधील काव्यरचना केल्या. त्यांनी मुस्लिम धर्माबरोबर हिंदू धर्मावर आधारित काव्य लिहिले. मोहरमचा मान हिंदूंकडे, तर दसरा सणातील आपटा पूजन, होळी पेटवणे, रंगपंचमीचा मान मुस्लिम बांधवांक डे आहे. असे हे सामाजिक सलोख्याचे चित्र येथे दिसते.