भाविकांवर जातीयवादी टिपणी, गिरनारवरील पंड्यांविरोधात कारवाईसाठी जैन संघटनेचे मोदींना साकडे
By अविनाश कोळी | Published: December 3, 2022 06:47 PM2022-12-03T18:47:40+5:302022-12-03T18:48:41+5:30
गुजरातच्या गिरनार पर्वतावरील भगवान नेमिनाथ यांच्या मोक्षस्थानी नियुक्त केलेले पंडे (स्थानिक पुजारी) भाविकांवर दहशतही निर्माण करीत आहेत
सांगली : गुजरातच्या गिरनार पर्वतावरील भगवान नेमिनाथ यांच्या मोक्षस्थानी नियुक्त केलेले पंडे (स्थानिक पुजारी) भाविकांवर जातीयवादी टिपणी करून दहशतही निर्माण करीत आहेत. त्यामुळे संबंधित पंड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जैन संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय सदस्य सुरेश पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले की, यासंदर्भातील निवेदन पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत यांना देण्यात आले आहे. गुजरातच्या जुनागडजवळील गिरनार पर्वत हिंदू व जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. याठिकाणी दत्त देवस्थान तसेच जैन समाजाचे २२ वे तीर्थंकर श्री नेमिनाथ भगवान यांचे मोक्षस्थान आहे. त्यामुळे लाखो भाविक दररोज येथे हजारो किलोमीटर अंतर कापून येत असतात.
भाविक श्रद्धेने याठिकाणी येत असताना येथील पंडे लोक त्यांच्याशी अनादर दाखवितात. दर्शन घेताना त्यांना झिडकारणे, मोठ्या आवाजात त्यांच्याशी उद्धटपणे वागणे, शिवीगाळ करणे अशा गोष्टी ते करतात. त्यामुळे भाविकांचा हिरमोड होत आहे. याशिवाय नेमिनाथ भगवान यांच्या चौथ्या टोकाला असणाऱ्या श्रद्धास्थानी जैन बांधवांवर जाती-धर्मावरून टिपणी केली जाते.
देवाच्या पवित्र स्थानी अशाप्रकारची भाषा, वागणूक व वातावरण अयोग्य व सहन करण्यासारखे नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त जैन समाजाच्या भावना विचारात घेऊन संबंधित पंड्यांवर कारवाई करावी. दहशत निर्माण करणाऱ्यांना तिथून हटवावे. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.
शारीरिक कष्टापेक्षा मनाच्या वेदना असह्य
पाटील म्हणाले की, गिरनार पर्वत चढताना भाविकांना हजारो पायऱ्या चढण्याचे कष्ट घ्यावे लागतात. आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर त्यांना हे कष्ट जाणवत नाहीत, मात्र पंडे ज्या पद्धतीने भाविकांना दुखावत आहेत, त्या वेदना भाविकांना असह्य होत आहेत.
पंतप्रधानांकडून अपेक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिरनार पर्वत क्षेत्राचा विकास केला आहे. त्यामुळे या प्रश्नावरही ते दखल घेतील, अशी अपेक्षा आहे. नाथसंप्रदायाचे महंत असलेले योगी आदित्यनाथ यांनाही आम्ही निवेदन दिले आहे, असे पाटील म्हणाले.