सांगलीत खवल्या मांजराचे १२ लाखांचे खवले जप्त, तस्करीप्रकरणी रत्नागिरीतील दोघांना अटक

By अविनाश कोळी | Published: May 3, 2023 04:19 PM2023-05-03T16:19:19+5:302023-05-03T16:19:36+5:30

कुपवाड एमआयडी पोलीस ठाणे येथे वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल

Cat scales worth 12 lakhs seized in Sangli, two arrested from Ratnagiri in smuggling case | सांगलीत खवल्या मांजराचे १२ लाखांचे खवले जप्त, तस्करीप्रकरणी रत्नागिरीतील दोघांना अटक

सांगलीत खवल्या मांजराचे १२ लाखांचे खवले जप्त, तस्करीप्रकरणी रत्नागिरीतील दोघांना अटक

googlenewsNext

सांगली : जंगली खवल्या मांजराच्या खवल्याची तस्करी करणार्‍या इम्रान अहमद मुलाणी (वय ४२ रा. मु.पो. अलोरे ता.चिपळूण जि. रत्नागिरी) व दिनेश गोपाळ डिंगणकर (वय ४५ रा. चिंद्रवळे, ता. गुहागर जि. रत्नागिरी) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली दोघांकडून ११ लाख ८७ हजाराचे खवले जप्त केले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी पथकाला सूचना दिल्या होत्या. सहायक निरीक्षक संदीप शिंदे व अंमलदारांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना कुपवाड ते अहिल्यानगर रस्त्यावर शिवमुद्रा चौकात दोघेजण दुर्मिळ संरक्षित व नामशेष होत असलेल्या खवल्या मांजराचे खवले विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. पथकाने वन अधिकार्‍यासमवेत शिवमुद्रा चौकात सापळा लावला. दोघे संशयित आले. त्यांना पळून जाण्याची संधी न देता जागीच पकडून ठेवले. दोघांची झडती घेतली असता इम्रान मुलाजी याच्या पाठीवरील सॅकमध्ये एका गोणीमध्ये खवले मिळाले. जंगली खवल्या मांजराच्या अंगावरील खवले असून त्याच्या विक्रीसाठी आल्याचे दोघांनी सांगितले. 

खवल्याबाबत विचारणा केली असता गावाकडील शेतामध्ये मृत झालेल्या खवल्या मांजराचे असल्याचे त्यांनी सांगितले. वन विभागाकडील मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, वनपाल सुधार महालिंग भोरे यांनी सदरचे खवले अतिशय दुर्मीळ संरक्षित व नामशेष होत असलेल्या खवल्या मांजराचे असल्याचे सांगितले. खवल्याचे वजन ४ कि. ७५० ग्रॅम असून किंमत ११ लाख ८७ हजार ५०० रुपये इतकी आहे. दोघांविरुध्द कुपवाड एमआयडी पोलीस ठाणे येथे वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निरीक्षक सतिश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, अंमलदार संदिप पाटील, संजय कांबळे, संकेत मगदुम, सुनिल चौधरी, सुधीर गोरे, अमोल ऐदाळे, राहूल जाधव, गौतम कांबळे, अजय बेंदरे, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, कॅप्टन गुंडवाडे, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील वनपाल तुषार भोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Cat scales worth 12 lakhs seized in Sangli, two arrested from Ratnagiri in smuggling case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.