९० अंशाची चढाई, अनेक अडथळ्यांना पार करत इंद्रजितने केला कळकराय सुळका सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 05:53 PM2021-12-15T17:53:43+5:302021-12-15T17:55:09+5:30
या सुळक्याची उंची २०० फुटांपर्यंत असून या ठिकाणी सकाळी प्रचंड वेगाने वारे वाहते. या वाऱ्याचा वेग ताशी १०० ते १५० कि. मी इतका असतानादेखील या धाडसी तरुणांनी या सुळक्यावर यशस्वी चढाई केली.
उमेश जाधव
कामेरी : सांगली जिल्ह्यातील अनेक तरुणांमध्ये साहसी पर्यटनाची ओढ वाढलेली आहे. असाच साहसी व अत्यंत कठीण श्रेणीत मोडणारा कर्जतमधील ढाक भैरी येथील गुहा आणि याच किल्ल्याजवळ असणारा कळकराय सुळका कामेरी (ता. वाळवा) येथील इंद्रजीत खंडागळे याने सर केला. या मोहिमेत त्याच्यासोबत त्याचे रत्नागिरी येथील मित्र अरविंद नवेले, धीरज पाटकर, आकाश नाईक, उमेश गोठीवरेकर व प्राची नाईक यांचा समावेश होता.
या किल्ल्यावर कर्जत वरून सांडशी या गावातून जातात. अनेक डोंगर पार करत या ठिकाणी पोहोचायला पाच तास लागतात. या चमूने सकाळी नऊ वाजता या ट्रेकची सुरुवात केली. अवघड असे अनेक डोंगर कपाऱ्यांच्या अडथळ्यांना पार करत पाच तासांनंतर दुपारी २.३० वाजता या चमूला ढाकच्या पायथ्याशी पोहोचण्यात यश आले. या ढाकच्या गुहेमध्ये जाण्यासाठी सरसोट ९० अंशाची चढाई सुरू झाली. सर्व जण या गुहेत पोहोचल्यानंतर तिथे थोडावेळ थांबून पुन्हा त्याच मार्गाने खाली उतरण्याचा खतरनाक असा उलटा प्रवास करत पुन्हा या चमू ढाकच्या पायथ्याशी असलेल्या गुहेत थांबला.
याच ढाकच्या किल्ल्याच्या जवळच असलेला कळकराय सुळक्यावर दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजता खंडागळे व त्याच्या सहकाऱ्यांनी चढाई (क्लाइंबिंग) करण्यास सुरुवात केली. या सुळक्याच्या माथ्यावर सकाळी ११ वाजता सर्वांनी पाय रोवला.
प्रचंड वाऱ्यातही चढाई
या सुळक्यावर पोहोचल्यावर थोड्याच वेळात सुळक्याच्या माथ्यावरून त्याच्या पायथ्याशी रॅपलिंग करत खाली आले आणि या तरुणांच्या धाडसी मोहिमेची सांगता झाली. या सुळक्याची उंची २०० फुटांपर्यंत असून या ठिकाणी सकाळी प्रचंड वेगाने वारे वाहते. या वाऱ्याचा वेग ताशी १०० ते १५० कि. मी इतका असतानादेखील या धाडसी तरुणांनी या सुळक्यावर यशस्वी चढाई केली.