‘सीसीटीव्ही’लाही चोरांचे आव्हान
By Admin | Published: November 6, 2014 10:43 PM2014-11-06T22:43:49+5:302014-11-06T23:01:11+5:30
घटना वाढल्या : सांगली जिल्ह्यात वर्षात वीस लाखांची रोकड पळवली
अंजर अथणीकर - सांगली -बँकांमध्ये व बाहेर असणारे सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ असा प्रकार होऊन बसला आहे. हलक्या दर्जाचे कॅमेरे बसविल्याने पोलिसांच्या तपास कामात अडथळे निर्माण झाले असून, काही ठिकाणी अनेकदा आवाहन करूनही बाहेरील बाजूस कॅमेरे बसविण्याबाबत बँकांनी हात अखडता घेतला आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे. गेल्या वर्षभरात वीस लाखांहून अधिक रोकड चोरट्यांनी बँकांसमोरून लंपास केली आहे.
गेल्या चार-पाच वर्षात सर्वच बँका, वित्तीय संस्था आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात झाली आहे. कॅशियरसह आतील बाजूस चांगल्या प्रकारचे कॅमेरे बसविले जातात, मात्र इमारतीच्या बाहेरील बाजूस बँका दर्जेदार कॅमेरे बसवत नाहीत. काही ठिकाणी तर इतक्या उंचीवर कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत की, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे चेहरेही स्पष्ट दिसत नाहीत. ‘बॅक अप्’मध्ये जाऊन हे स्पष्ट झाले असले तरी, त्याची काळजी बॅँका घेताना दिसत नाहीत.
गेल्या वर्षभरात सांगली, विटा व इस्लामपूर शहरामध्ये सात ते आठ बॅगा पळविण्याचे प्रकार झाले. यामध्ये सुमारे वीस लाखांहून अधिक रोकड पळविण्यात आली. या बॅगा बँकांसमोरून पळविण्यात आल्या, मात्र एकाही कॅमेऱ्यामध्ये चोरट्यांचे चेहरे दिसले नाहीत. बाहेरील बाजूला कॅमेरा बसविणे आमची जबाबदारी नाही, असे सांगून बँक प्रशासन आपली जबाबदारी टाळत आहेत. त्याचबरोबर अनेकदा आवाहन करुनही बँक चालकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
सांगलीतील पुष्पराज चौकामध्ये महिन्यापूर्वीच एका व्यापाऱ्याची पाच लाखांची बॅग पळविण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी संबंधित बँक चालकांना इमारतीबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना केल्या होत्या.
आता काल, बुधवारी एका व्यापाऱ्याची ८६ हजारांची बॅग तेथूनच पळविण्यात आली असताना, चोरट्यांचे चेहरे कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्व बँकांना सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँका केवळ आतील बाजूस कॅमेरे बसवतात, यामुळे समस्या निर्माण होतात. यापुढे इमारती बाहेरही कॅमेरे बसवले पाहिजेत. आम्ही तीन महिन्याला एकदा ‘बॅकअप’ घेऊन त्याचे रेकॉर्डिंग कंट्रोल रूमला देतो.
- लक्ष्मीकांत कट्टी, बँक आॅफ इंडियाचे करन्सी (रोकड) अधिकारी
सर्व बॅँकांना सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देऊनही त्याचे पालन केले जात नाही. यापूर्वी चोरी झालेल्या ठिकाणीही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. आता पुन्हा बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कॅमेरे बसवण्यासाठी सूचना त्यांना देण्यात येतील.
- प्रकाश गायकवाड, पोलीस उपअधीक्षक, सांगली
सांगली, इस्लामपूर, विट्यातून सात बॅगा लंपास
गेल्या वर्षभरातून सांगलीमध्ये बँकांसमोरुन तीन बॅगा, तर विट्यामध्ये तीन व इस्लामपूरमध्ये एक बॅग पळविण्याचा प्रकार झाला आहे. यामधून सुमारे वीस लाखांची रोकड पळविण्यात आली आहे. यातील एकही चोरटा पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. या चोरट्यांचे फुटेज मिळविण्यातही पोलिसांना यश आलेले नाही.