गणेश मंडळासमोर यंदा ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे आवश्यक : सुनील फुलारी

By घनशाम नवाथे | Published: August 24, 2024 09:24 PM2024-08-24T21:24:02+5:302024-08-24T21:24:23+5:30

सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

'CCTV' cameras are necessary in front of Ganesh Mandal this year: Sunil Phulari | गणेश मंडळासमोर यंदा ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे आवश्यक : सुनील फुलारी

गणेश मंडळासमोर यंदा ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे आवश्यक : सुनील फुलारी

घनशाम नवाथे

सांगली : यंदाच्या गणेशोत्सवात पोलिस व जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणाऱ्या प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे. उत्सवाच्या काळात या कॅमेऱ्यांचा उपयोग होईल. त्यानंतर परिसरातच हे कॅमेरे कार्यरत ठेवल्यास पोलिसांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी त्याचा उपयोग होईल असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.

विशेष महानिरीक्षक फुलारी यांनी सांगलीच्या दौऱ्यावर असताना काही गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक घेतली. त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. त्यानंतर ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका, त्यानंतरची राज्यातील राजकीय व सामाजिक स्थिती, बंद, आंदोलने यामुळे पोलिसांवर ताण जाणवत आहे. अशातच आता आगामी गणेशोत्सवासह सर्व सण शांततेत व मंगलमय वातावरणात पार पडावेत यासाठी पोलिस सतर्क आहे. गणेश मंडळांनी त्यांना मिळणाऱ्या वर्गणीचा सदुपयोग करावा. वेळेच्या मर्यादेचे पालन करावे. ध्वनीक्षेपकाबद्दल असलेल्या सूचना, रस्त्यावर किती टक्केपर्यंत मंडप उभारावा याबाबत दिलेल्या सुचनांचे पालन करावे. शासनाच्या स्पर्धेत सहभागी व्हावे. सर्व प्रकारचे प्रदुषण टाळावे. पर्यावरणपूरक उत्सव करावा.

फुलारी पुढे म्हणाले, ध्वनी प्रदुषण तसेच प्रकाश प्रदुषण याबाबत पोलिस दलाकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रदुषण करणाऱ्या उत्पादनावर बंधन नाही, परंतू त्याचा वापर करून कायदेशीर तरतुदींचे भंग केल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागते. आगामी गणेशोत्सव शांततेत पार पाडला जावा यासाठी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. यंदाच्या उत्सवात प्रत्येक मंडळाने लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. उत्सव काळात आणि त्यानंतरही त्याचा सर्वांना उपयोग होईल.

यावेळी अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय अधिकारी तसेच पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सुधीर भालेराव आदी उपस्थित होते.

गणेश मंडळांना पारितोषिक देणार

पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, जी गणेश मंडळे अटी-शर्तींचे पालन करतील. चांगले देखावे उभारतील. डीजेमुक्त आणि पर्यावरणपूरक सण साजरा करतील अशा मंडळांना उपविभागीय पोलिस अधिकारी स्तरावर पारितोषिके दिली जातील. प्रत्येक गणेश मंडळांना पोलिस दत्तक घेतील. दत्तक मंडळाच्या ठिकाणी नेमल्या जाणाऱ्या पोलिसांना सहकार्य करावे.

वर्गणीसाठी जबरदस्ती नको

गणेश मंडळांनी वर्गणीसाठी कोणाला जबरदस्ती करू नये. जबरदस्तीने वर्गणी मागितल्याची तक्रार आल्यास नाईलाजाने आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल असा इशारा अधीक्षक घुगे यांनी यावेळी दिला.

Web Title: 'CCTV' cameras are necessary in front of Ganesh Mandal this year: Sunil Phulari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.