सांगलीत पूरग्रस्त भागावर सीसीटीव्हीचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 10:47 PM2020-05-25T22:47:20+5:302020-05-25T22:48:48+5:30
आयुक्त कापडणीस यांच्या सूचनेनुसार पूरग्रस्त भागात अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी चिंतामणी कांबळे व पथकाकडून प्रबोधन प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे नागरिकांशी संपर्क करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नागरिकांचा जीव कसा वाचवावा, याबाबत जनजागृती सुरू आहे.
सांगली : गतवर्षी सांगली, मिरज शहराला महापूराचा मोठा दणका बसला होता. त्यामुळे यंदा महापालिकेने संभाव्य महापूराच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आतापासून यंत्रणा सज्ज केली आहे. शहरातील पूरग्रस्त भागात सीसीटीव्ही बसविले जात असून नव्याने दोन यांत्रिकी बोटी, हजार लाईफ जॅकेटसह विविध साहित्यही महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे दाखल होत आहे. संभाव्य महापूरच्या पार्श्वभूमीवर आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला आहे. गतवर्षी महापूराने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे धिंडवडे काढले होते. त्यामुळे महापालिकेने आतापासून यंत्रणा सज्जतेवर भर दिला आहे. गतवर्षी नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यासाठी तरुण मंडळे, बोट क्लबनी मदतीचा हात दिला होता. या मंडळ, बोट क्लबशी महापालिकेने संपर्क साधला आहे.
सध्या महापालिकेकडे ७ यांत्रिकी बोटी आहे. त्यात आता नव्याने दोन यांत्रिकी बोटीची भर पडणार आहे. त्याशिवाय ५० लाईट जॅकेट उपलब्ध आहेत. महापालिकेने आणखी १ हजार लाईफ जॅकेटची खरेदी सुरू केली आहे. आपत्ती व्यवस्थापनातर्गंत विविध साहित्यांचीही खरेदी केली जात आहे. महापालिकेच्यावतीने गावभाग, कृष्णा नदी काठ, दत्तनगर, शामरावनगर, कोल्हापूर रोड या पूरपट्ट्यात १८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरूवात केली आहे. हे कॅमेरे महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला जोडले जाणार आहेत. त्यामुळे पुराचे पाण्यावर लक्ष ठेवता येणार आहे. आयुक्त कापडणीस यांच्या सूचनेनुसार पूरग्रस्त भागात अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी चिंतामणी कांबळे व पथकाकडून प्रबोधन प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे नागरिकांशी संपर्क करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नागरिकांचा जीव कसा वाचवावा, याबाबत जनजागृती सुरू आहे.
सात ठिकाणी बोट हाऊस
गतवर्षी पुरावेळी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बोटी वेळेवर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे यंदा आयुक्त कापडणीस यांनी पुरग्रस्त भागात सात ठिकाणी बोट हाऊस उभे करण्याच्या सूचना अग्निशमन विभागाला दिले आहेत. या सात ठिकाणी प्रत्येक एक बोट व प्रशिक्षित कर्मचारी असेल. त्यामुळे पुराचे पाणी वाढल्यास संबंधित परिसरात तातडीने नागरिकांपर्यंत पोहोचता येणार आहे. तसे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे.