महापौर निवडीच्या मतदान प्रक्रियेची सीडी भाजपकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:27 AM2021-03-17T04:27:58+5:302021-03-17T04:27:58+5:30
सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीत फुटलेल्या सहा नगरसेवकांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपने ऑनलाइन मतदान प्रक्रियेची सीडी पुराव्यादाखल ...
सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीत फुटलेल्या सहा नगरसेवकांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपने ऑनलाइन मतदान प्रक्रियेची सीडी पुराव्यादाखल मिळविली आहे. आता गुरुवारी या नगरसेवकांच्या अपात्रतेसाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे.
महापालिकेत बहुमत असतानाही महापौर व उपमहापौर निवडीत भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यांचे सहा सदस्य व एक अपक्ष नगरसेवकाने काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केले होते. या फुटीर नगरसेवकांविरुद्ध भाजपने अपात्रतेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सभागृह नेते विनायक सिंहासने यांनी महापालिका प्रशासनाकडे ऑनलाइन मतदान प्रक्रियेची सीडी मागितली होती. त्यासाठीचे शुल्कही भरले होते; पण सीडी देण्यास टाळाटाळ सुरू होती. मंगळवारी स्थायी सभापती पांडुरंग कोरे, विनायक सिंहासने, धीरज सूर्यवंशी, संजय यमगर यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेतली. मतदान प्रक्रियेची सीडी देण्यास विलंब होत असल्याची तक्रारही त्यांनी आयुक्तांकडे केली.
त्यानंतर आयुक्तांनी सहायक आयुक्त अशोक कुंभार यांना तातडीने मतदान प्रक्रियेची सीडी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ही सीडी भाजप पदाधिकाऱ्यांना मिळाली. या विलंबाबद्दल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. फुटीर नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी गुरुवारी पुणे विभागीय आयुक्तांकडे भाजपतर्फे अर्ज सादर केला जाणार आहे. त्यावेळी महापौर, उपमहापौर मतदान प्रक्रियेची सीडी पुरावा म्हणून सादर केली जाणार आहे.