बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:24 AM2021-04-12T04:24:50+5:302021-04-12T04:24:50+5:30
सांगली : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती १४ एप्रिल रोजी साजरी होत आहे. या दिवशी घरात ...
सांगली : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती १४ एप्रिल रोजी साजरी होत आहे. या दिवशी घरात जयंती साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
जयंती महोत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष प्रफुल्ल ठोकळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून यंदा बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. जयंतीनिमित्त कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार नाही. बसस्थानक परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची विद्युत रोषणाई केली जाणार आहे. तसेच जयंतीच्या पूर्वसंध्येला केवळ पाच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांना अभिवादन केले जाईल.
जयंतीदिवशी पाच व्यक्तींनी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करावे. परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन शहरातील सर्वच मंडळे व आंबेडकरी जनतेला करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सचिव लहरीदास कांबळे, राहूल साबळे, रामभाऊ पाटील उपस्थित होते.
दरम्यान जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. जयंतीदिवशी प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी पाचपेक्षा जास्त नसावी. तसेच सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून जयंती साजरी करण्यात यावी. सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य इत्यादीचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये, असे आवाहनही केले आहे.