सांगली, मिरजेत नाताळ उत्साहात साजरा : चर्चमध्ये विशेष प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:27 AM2018-12-26T00:27:46+5:302018-12-26T00:29:46+5:30
मंगळवारी सांगली व मिरज शहरात नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या चर्चना आकर्षक विद्युतरोषणाई केली होती. गेल्या आठवड्यापासून विविध कार्यक्रमांचे
सांगली/मिरज : मंगळवारी सांगली व मिरज शहरात नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या चर्चना आकर्षक विद्युतरोषणाई केली होती. गेल्या आठवड्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नाताळनिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. ख्रिसमसनिमित्त विशेष ट्री विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते.
येशू ख्रिस्तांच्या करुणा व क्षमाशीलतेच्या संदेशाचे स्मरण करून देणारा सण म्हणून नाताळकडे पाहिले जाते. नाताळनिमित्त मंगळवारी शहरातील सांगली-मिरज रोडवरील सांगली चर्चमध्ये, कापड पेठ परिसरातील चर्चसह विविध उपनगरांमध्ये असलेल्या चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनीही ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. चर्च परिसरात देखावाही उभारण्यात आला होता.
मिरज शहरातही नाताळ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा, ख्रिस्तजन्म संदेशासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शहरातील विविध चर्चच्या इमारती रोषणाईने झगमगत होत्या. शहर व परिसरात नाताळ मोठ्या प्रमाणात साजरा झाला.
मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये ख्रिस्तजन्म उपासना व नाताळनिमित्त संजय गायकवाड यांनी ख्रिस्त जन्माचा संदेश दिला. महापौर संगीता खोत, माजी आमदार शरद पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील, सदाशिव वाघमारे, सचिन जाधव, नगरसेवक संजय मेंढे, अय्याज नायकवडी, चंद्रकांत आंबी, इलियास शेख, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समीत कदम यांच्यासह राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
नाताळनिमित्त मिरज ख्रिश्चन चर्च, रोझरी चर्च, अल्फोन्सा चर्च, सेंटपिटर तेलगू चर्च यांसह शहरातील विविध चर्चच्या इमारती विद्युत रोषणाईने सजल्या होत्या. ख्रिस्तजन्म उपासनेसह नाताळचा विशेष संदेश व ख्रिस्ती धर्मगुरूंच्या उपस्थितीत उपासना सभा, तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. इस्त्राईलनगर, कमान वेस, वानलेसवाडी, बेथेलहेमनगर परिसरात विद्युत रोषणाईसह मोठे आकाशदिवे झगमगत होते.
नाताळनिमित्ताने जागोजागी ख्रिसमस ट्री सजविण्यात आले होते. विविध संस्थांतर्फे धार्मिक गीतगायन स्पर्धा, ख्रिस्त जन्माची नाटिका, रांगोळी स्पर्धा यांसह निरनिराळे कार्यक्रम पार पडले. दि. ३१ रोजी रात्री नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फेरी व कँडल लाईट सर्व्हिस कार्यक्रम होणार आहे. दि. १ जानेवारी रोजी सकाळी प्रार्थना व नूतन वर्षाची उपासना होणार आहे.
चर्चवर विद्युत रोषणाई, घरांनाही सजावट
मिरज शहरातील विविध चर्चच्या इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाताळ व नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात विविध उपक्रम सुरू आहेत. केवळ चर्चच नव्हे, तर ख्रिस्ती बांधवांनी आपल्या घरांवरही आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. शहरात सर्वत्र नाताळचा उत्साह दिसून येत आहे.