सांगलीत महावीर जयंती साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:23 AM2021-04-26T04:23:41+5:302021-04-26T04:23:41+5:30
ओळी : नेमीनाथनगर येथील भगवान महावीर कोविड सेंटरमध्ये महावीर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सुरेश पाटील, डाॅ. राहुल पाटील, ...
ओळी : नेमीनाथनगर येथील भगवान महावीर कोविड सेंटरमध्ये महावीर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सुरेश पाटील, डाॅ. राहुल पाटील, विद्या सावंत, ऐश्वर्या गांधी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जैन धर्मियांचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती रविवारी साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोना नियमांचे पालन करीत मंदिरात पुजाऱ्यांनी पूजाअर्चा केली. जैन समाजाने घरातून महावीर जयंती साजरी केली. नेमीनाथनगर येथील कोविड सेंटरमध्येही भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
दरवर्षी भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच सायंकाळी मिरवणूकही काढली जाते. यंदा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने सध्या राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. त्यानुसार सर्वच मंदिरे बंद आहेत. त्यामुळे जैन धर्मियांनी घरातून महावीर जयंती साजरी केली. मंदिरात केवळ पूजाअर्चा करण्याची परवानगी आहे. सकाळी मंदिरातील पुजाऱ्यांनी पूजाअर्चा केली.
दरम्यान नेमीनाथनगर येथील श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट संचालित भगवान महावीर कोविड हॉस्पिटल येथे भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली. डॉ. राहुल पाटील, डॉ. ऐश्वर्या गांधी, डॉ. सौरभ मल्लेवाडे, डॉ. विद्या सावंत यांच्याहस्ते दीपप्रज्वालन करून भगवान महावीरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी हॉस्पिटलचे मुख्य संयोजक माजी महापौर सुरेश पाटील यांनी भगवान महावीरांचा 'जगा व जगू द्या'चा संदेश संपूर्ण जगाला शांततेच्या वातावरणात नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. बी.एस. पाटील, डॉ. प्रीतम अडसूळ, डॉ. दिनेश भबान, डॉ. अमोल पाटील, राजगोंडा पाटील, सुभाष देसाई, गौतम पाटील उपस्थित होते.