सांगली: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच नागपंचमी साजरी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 05:56 PM2022-07-30T17:56:22+5:302022-07-30T17:56:55+5:30
वनविभागाने नागपंचमीसाठी १२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दहा गस्ती पथके शिराळा येथील ३२ गल्ल्यांमध्ये पथकांचे लक्ष असणार आहे
सांगली : कोरोना संसर्ग कमी होत असल्याने प्रथमच नागपंचमी सण मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. यंदा नागपंचमी साजरी करताना उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. वनविभाग, पोलीस यंत्रणा व स्थानिक प्रशासनाने समन्वय साधत शांततेत व सुरळीत नागपंचमी पार पाडण्यासाठी दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
नागपंचमीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक निता कट्टे, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले की, शिराळा नगरपंचायतीने आवश्यक त्या उपाययोजनांवर काम सुरू करावे. भाविक असतील त्या भागाची साफसफाई करण्यावर भर द्यावा. येणाऱ्या भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होईल याचे नियोजन करावे. गर्दीमध्ये ज्या लोकांना कोरोनाची लक्षणे जाणवतील अशांसाठी कोरोना तपासणी पथक तैनात ठेवल्यास त्याचा प्रभावी वापर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार गणेश शिंदे, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, निसर्ग प्रतिष्ठानचे डॉ. रवींद्र व्होरा, अंबामाता मंदिराचे अध्यक्ष संभाजी गायकवाड आदी उपस्थित होते.
वन, पोलिसांचा बंदोबस्त
वनविभागाने नागपंचमीसाठी १२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दहा गस्ती पथके शिराळा येथील ३२ गल्ल्यांमध्ये पथकांचे लक्ष असणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांचे ५०० जणांचे पथक तैनात असणार आहे. यात एक पोलीस उपअधीक्षक, १४ पोलीस निरीक्षक, ३५ सहायक पोलीस निरीक्षक, ६० महिला अंमलदार, ४४ वाहतूक शाखेतील कर्मचारी तर ३३० पोलीस असणार आहेत.