शिराळा नागपंचमी उच्च न्यायालयाच्या आदेशानूसारच साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 07:07 PM2021-08-04T19:07:21+5:302021-08-04T19:10:56+5:30
Nag Panchami Sangli : नाग पंचमी सणासाठी नागांचा वापर करणे यासाठी न्यायालयानेही बंदी घातली आहे. त्यामुळे नागपंचमी सण साजरा करण्यासाठी नागांच्या प्रतिकात्मक प्रतिमांचे पुजन करावे, असे आवाहन प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी केले.
सांगली : नाग पंचमी सणासाठी नागांचा वापर करणे यासाठी न्यायालयानेही बंदी घातली आहे. त्यामुळे नागपंचमी सण साजरा करण्यासाठी नागांच्या प्रतिकात्मक प्रतिमांचे पुजन करावे, असे आवाहन प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात नागपंचमी सण आयोजनाबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले, शिराळ तहसलिदार गणेश शिंदे, उपवनसंरक्षक विजय माने, शिराळाच्या नगराध्यक्षा सुनिता निकम, सहायक वनरक्षक (वनी) विजय गोसावी, शिराळा पोलीस निरिक्षक सुरेश चिल्लावार, शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील आदी उपस्थित होते.
प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे म्हणाल्या, मानवाला ज्या प्रमाणे जगण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे वन्य प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. प्राण्यांच्या जीवनशैलीत हस्तक्षेप करु नका, वन्य प्राण्यांमध्ये नाग, साप यांचाही समावेश होतो. नागपंचमीला पुजण्यासाठी नागांना पकडू नका, नागांसाठी निसर्गाने दिलेला अधिवास नष्ट करु नका, नाग, साप पकडणे, वाहतुक करणे, अधिवास नष्ट करणे, नागाची शिकार करणे अथवा नागांचे प्रदर्शन करणे यावर कायद्याने बंदी आहे.
- मौसमी चौगुले-बर्डे म्हणाल्या, शिराळा व परिसरात साजरा करण्यात येणारी नागपंचमी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये साजरी करण्यात यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करण्यात येवू नये. नागपंचमी साजरी करताना प्रतिकात्मक प्रतिमेचे पुजन करुन निसर्ग संवर्धनासासठी हातभार लावावा, यासाठी प्रत्येक नागरिकाने डोळसपणे सण साजरा करावा. नागपंचमी सण साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग, वन विभाग व महसुल विभाग यांनी समन्वयाने काम करावे. आवश्यक तो बंदोबस्त ठेवण्यात यावा. शिराळा परिसरात ड्रोनद्वारे निरिक्षण ठेवावे. नागपंचमी सणाच्या आगोदर जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात यावे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात याव्यात. जे कोणी कायद्याचे उल्लंघन करतील. त्यांच्यावर नियमानूसार कठोर कारवाई करावी. असे आदेश त्यांनी यावेळी दिले.
- अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले यावेळी म्हणाल्या, नागपंचमी सणासाठी 200 पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिराळ्यात पाच ठिकाणी, व्हिडीओग्राफर नियुक्त करण्यात येतील. ध्वनी प्रदुषण होऊ नये यासाठी ध्वनी मापन यंत्रणा ही कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे. जे कोणी कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कायद्या आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी नागपंचमी सणाच्यावेळी जनतेने सहकार्य करावे. निसर्गाच्या संवर्धानासाठी खऱ्या नाग किंवा सापाऐवजी प्रतिकात्मक प्रतिमेचे पुजन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
- शिराळाच्या नगराध्यक्षा सुनिता निकम यांनी नागपंचमी सण साजरा करण्यासाठी पालखी व पुजा करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केली. यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी याबाबत सविस्तर मागणी प्रशासानाकडे सादर करावी असे आदेशित केले.
- उपवनसंरक्षक विजय माने यांनी नागपंचमी सणासाठी वन विभागाकडून सुरु असलेली तयारी, करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांची यावेळी सविस्तर माहिती दिली.
- मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी शिराळा व परिसरात नागपंचमी साजरी करताना मा. उच्च्ा न्यायालयाने दिलेल्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोरपणे कायद्याची अंमलबजावणी करावी. यासाठी समन्वय ठेवावा असे सूचित केले.