शंभराव्या नाट्य संमेलनाची ५ नोव्हेंबरला सांगलीत मुहूर्तमेढ; मोटायसायकल रॅली, नाट्यप्रयोगाचे आयोजन

By अविनाश कोळी | Published: October 25, 2023 01:04 PM2023-10-25T13:04:58+5:302023-10-25T13:06:06+5:30

सांगली : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ येत्या ५ नोव्हेंबर रोजी सांगलीत करण्यात येणार आहे. ...

Celebration of 100th Natya Samelan on November 5 in Sangli; Organization of motorcycle rally, drama | शंभराव्या नाट्य संमेलनाची ५ नोव्हेंबरला सांगलीत मुहूर्तमेढ; मोटायसायकल रॅली, नाट्यप्रयोगाचे आयोजन

शंभराव्या नाट्य संमेलनाची ५ नोव्हेंबरला सांगलीत मुहूर्तमेढ; मोटायसायकल रॅली, नाट्यप्रयोगाचे आयोजन

सांगली : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ येत्या ५ नोव्हेंबर रोजी सांगलीत करण्यात येणार आहे. राज्यातील नामांकित रंगकर्मींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रभर विविध उपक्रमांनी शंभरावे नाट्य संमेलन साजरे केले जाणार आहे. नाट्यपंढरी सांगलीत त्याची मुहूर्तमेढ होईल. सकाळी नऊ ते दहा या वेळेत सांगलीत मोटारसायकल दींडीचे आयोजन केले आहे. यावेळी गोविंद बल्लाळ देवल यांचे पोलिसप्रमुखांच्या कार्यालयासमोरील घर, मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह, सांगलीवाडी येथील काकासाहेब खाडिलकर यांचे दत्त मंदिर, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह तसेच विष्णुदास भावे यांचा गावभागातील भावेवाडा या सर्व नाट्य चळवळीच्या उगमाच्या श्रद्धास्थानातून संहिता सांगलीच्या गणपती मंदिरापर्यंत आणण्यात येतील. तिथून नाट्यदिंडी वाजत गाजत भावे नाट्य मंदिरात येईल. संहितांचे विष्णुदास भावे नाट्यगृहात विष्णुदासांच्या पुतळ्यासमोर पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले व अन्य मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व नांदीने मुहूर्तमेढ रोवण्यात येईल.

लेखक राजेंद्र पोळ यांच्या दहा नाट्यविषयक संहिता व गितांजली ठाकरे यांच्या ‘दऊत लेखणी’ या नाट्यविषयक विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात येईल. सोहळ्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, प्रशांत दामले, नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कार्यवाह अजित भुरे, सतील लटके, संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रेमानंद गजवी, संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, शशी प्रभू, अशोक हांडे उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी ४ नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता भावे नाट्यमंदिरात ‘चाणक्य’ हा नाट्यप्रयोग सादर होईल. पत्रकार परिषदेस गाडगीळ यांच्यासह उद्योजक गिरीश चितळे, भाऊसाहेब भोईर, प्रा. वैजनाथ महाजन, गिरीश महाजन, अंजली भिडे, चंद्रकांत धामणीकर, मुकुंद पटवर्धन, भालचंद्र चितळे, सनित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

विभागीय संमेलनाचे आयोजन

राज्यभरात विभागीय संमेलनांचे आयोजन केले जाणार आहे. त्याचे नियोजन सध्या सुरु आहे, अशी माहिती भोईर यांनी यावेळी दिली.

Web Title: Celebration of 100th Natya Samelan on November 5 in Sangli; Organization of motorcycle rally, drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली