वनीकरण विभागाने बांधलेली स्मशानभूमी ‘चोरीला’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:58 PM2018-01-02T23:58:52+5:302018-01-02T23:58:52+5:30
अविनाश बाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : ‘कायद्याचं बोला...’ या चित्रपटात दाखविण्यात आलेला, विहीर चोरीला गेल्याचा किस्सा सर्वज्ञात आहे. जांभुळणी (ता. आटपाडी) येथेही प्रत्यक्षात अशीच अचंबित करणारी घटना घडली आहे.
वनीकरण विभागाने या गावात एक स्मशानभूमी बांधली होती म्हणे. गावातील लोकांना थंड पाणी पिण्यासाठी वॉटर कुलर आणि ग्रामस्थांना बसायला तीन सतरंज्या दिल्या होत्या. पण यापैकी एकही वस्तू अस्तित्वात नाही!
आटपाडीतील स्वतंत्रपूर वसाहतीजवळ वनक्षेत्रपाल रोहयो कार्यालय आहे. मुळात गावापासून सुमारे तीन किलोमीटरवर दूर डुबई कुरणात हे कार्यालय आहे. या कार्यालयात ‘साहेब दाखवा आणि एक हजार मिळवा!’ असे नागरिकांतून बक्षीस लावले जाते. एखाद्दुसरा कारकुन कार्यालयात हजर असतो. साहेब कुठे आहेत, म्हणून विचारले, तर उत्तर मिळते, ‘मिटिंगला!’ मिटिंग कुठे आहे म्हटल्यावर, ‘सांगलीला’ असे हमखास उत्तर मिळते. या विभागाची कायम कशी ‘मिटिंग’ असते, हे नागरिकांना न सुटलेले कोडे आहे.
या विभागाकडे जांभुळणी येथे गट नंबर २६५ मध्ये १० हेक्टर, गट नंबर ३५६ मध्ये १६ हेक्टर, गट नंबर ५७७ मध्ये १६.५१ हेक्टर आणि गट नंबर ७४७ मध्ये ३५.६३ हेक्टर एवढी जमीन आहे. मात्र ग्रामस्थांची ग्रामवन समिती करून त्यांच्या सहकार्याने झाडे वाढावीत आणि निसर्गाचा समतोल राखला जावा, ही अपेक्षा या विभागातील भ्रष्ट अधिकाºयांनी फोल ठरविली आहे.
या गावात योजना राबविण्यासाठी अधिकाºयांना पूरक गावकरी मिळावेत, यासाठी चक्क ग्रामपंचायतीच्या बोगस लेटरहेड आणि सही-शिक्के वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बोगस वन समिती स्थापन करून वनीकरणाच्या नावावर भ्रष्टाचार सुरू आहे. वारंवार वन समिती बदलली जात आहे. या गावात अनुदानातून एकूण आठ कुटुंबांना गॅस कनेक्शन द्यायचे होते, पण एकाच घरातील तीन सख्ख्या बंधूंना गॅस कनेक्शन देण्यात आले. एक शासकीय नोकर आहे. त्याची पांढरी शिधापत्रिका असताना त्याला लाभ देण्याचा प्रताप या विभागाने केला आहे.
या गावात सुमारे दीड लाख रुपये खर्चून २०११-१२ मध्ये वनीकरण विभागाने स्मशानभूमी बांधली. पण त्यानंतर २०१६ मध्ये ग्रामपंचायतीनेही स्मशानभूमी बांधली. मग आधी वनीकरण विभागाने बांधलेली स्मशानभूमी गेली कुठे? याबाबत अशोक जुगदर यांनी माहिती अधिकारात या विभागाकडे लेखी विचारणा केली. त्यावर अधिकाºयांचे म्हणणे असे आहे की, आम्ही ग्रामपंचायतीला, आम्ही बांधलेली स्मशानभूमी का आणि कधी पाडली, याची माहिती विचारली. पण त्याचे उत्तर मिळू शकत नाही. शिवाय ग्रामस्थांनी कधीही मागणी केलेली नसताना आणि गावात कुणीही न पाहिलेल्या वस्तूंची केवळ खरेदी बिले दाखवून अधिकाºयांनी रक्कम हडप केली आहे. वॉटर कुलर आणि १० बाय १५ आकाराच्या तीन सतरंज्या २० मे २०१६ पासून गावात दिल्याचे केवळ कागदोपत्री दाखविले आहे. याबाबत विचारणा केली असता, माहिती सांगता येत नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले आहे.
आधी भ्रष्टाचार; मग ताबा!
दि. १३ जून २०१६ रोजी धनादेशाद्वारे विटा येथील एका दुकानातून ५१,५५० रुपयांना वॉटर कुलर आणि सतरंज्या खरेदी केल्या. एवढ्या साहित्याची जांभुळणीत वाहतूक करण्यासाठी चक्क तीन हजार भाडे धनादेशाने देण्यात आले. विशेष म्हणजे या वस्तूंची ताबा पावती मात्र दि. २० मे २०१६ ची आहे. या अधिकाºयांनी खरेदीआधी वस्तूंचा ताबा दिल्याची माहिती दिली आहे!