न्यायाधीश परीक्षेसाठी काेल्हापूरला केंद्र करा, सांगली वकील संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 11:30 AM2021-12-21T11:30:01+5:302021-12-21T11:50:58+5:30
सध्या ही परीक्षा केवळ मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे होत आहे. या भागातील वकिलांना दूरवरच्या केंद्रावर परीक्षा देणे अडचणीचे ठरत असते.
सांगली : एमपीएससीच्यावतीने घेण्यात येणाऱ्या न्यायाधीश परीक्षेसाठी पश्चिम महाराष्ट्रातून अनेक वकील बसत असतात. मात्र, सध्या ही परीक्षा केवळ मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे होत आहे. या भागातील वकिलांना दूरवरच्या केंद्रावर परीक्षा देणे अडचणीचे ठरत असते. त्यामुळे न्यायाधीश परीक्षेसाठी आयोगाच्यावतीने कोल्हापूर येथे केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी सांगली वकील संघटनेच्यावतीने करण्यात आली.
वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. संदीप लवटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वकील संघटनेच्या बैठकीत या आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला.
कोल्हापूर येथे तातडीने प्रथम वर्ग नायाधीश परीक्षांचे केंद्र सुरू करण्यासाठी संघटनेकडून राज्य शासन, उच्च न्यायालय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय यावेळी सर्वांनुमते घेण्यात आला.
सध्या राज्यात केवळ तीनच केंद्र असल्याने वकिलांना अडचणी येत आहेत. शिवाय महिला वकिलांना दूरवरचे हे केंद्र गैरसोयीचे आहेत. कोल्हापूरला केंद्र झाल्यास त्याचा फायदा सर्वांना होणार आहे. या परीक्षेसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक वकिलाला संधी मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापूर येथे परीक्षा केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष ॲड. नरेंद्र लांडे, सचिव शैलेश पाटील, महिला सचिव मुक्ता दुबे, कविता देशपांडे, शोभा चव्हाण, विक्रांत वडेर, शिवाजी कांबळे, दत्ता वठारे, चिराग सोनेचा, सुभाष संकपाळ, अश्विनी झाडबुके आदी उपस्थित होते.