कोयना, अलमट्टीच्या पाणी व्यवस्थापनात केंद्राने लक्ष द्यावे; खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 01:32 PM2024-07-25T13:32:43+5:302024-07-25T13:32:43+5:30
केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी महापुराचा प्रश्न उपस्थित
सांगली : ‘महाराष्ट्रात कृष्णा नदीला महापूर येईल, अशी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होत आहे. महापुराचे हे संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अलमट्टी आणि कोयना धरणातील पाणीसाठा व्यवस्थापन व्हावे, याबाबत कडक सूचना द्याव्यात,’ अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी बुधवारी लोकसभेत केली.
केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी विशाल पाटील यांनी महापुराच्या प्रश्नावर लक्ष वेधले. विशाल पाटील म्हणाले, ‘माझा सांगली मतदारसंघ आणि पश्चिम महाराष्ट्र महापुराने प्रभावित होत आला आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यात २००५, २०१९ आणि २०२१ ला महाप्रलंयकारी महापूर आला होता. आज पुन्हा एकदा महापुराची गंभीर समस्या निर्माण होताना दिसत आहे. या परिस्थितीकडे केंद्रीय जल आयोगाच्या धोरणानुसार धरणातील पाणीसाठ्याबाबतच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक आहे.
मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. त्यात चार मुद्द्यांचा प्राधान्याने विचार करायला हवा. ज्यात कृष्णा, कोयना, पंचगंगा या नद्यांतील पाणी आणि कोयना, अलमट्टी धरणातील पाणीसाठा याचे ‘रिअल टाइम मॉनिटरिंग’ करणे, पूर व्यवस्थापन आराखडा राबवणे, पूरपट्ट्यात आवश्यक पायाभूत सुविधा देणे आणि महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्यांतील पाटबंधारे विभागाचा समन्वय हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. कारण, या महापुरात मनुष्यबळ, पशुधन, शेतीसह मालमत्तेची मोठी हानी होते. हे टाळण्यासाठी केंद्राने लक्ष द्यायला हवे.’
आसामप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष द्या
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात आसाममधील पूरबाधित क्षेत्राचा उल्लेख केला आहे. त्याप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातील पूरबाधित क्षेत्राचा विचार करावा. येथे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका विशाल पाटील यांनी केंद्रीय अधिवेशनातील चर्चेवेळी मांडली.