केंद्र शासनाने साखर उद्योग खुला करावा
By admin | Published: November 9, 2014 10:51 PM2014-11-09T22:51:46+5:302014-11-09T23:41:18+5:30
शिवाजीराव नाईक : शिवाजी केन प्रोसेसर्स गळीत हंगाम प्रारंभ
कोकरूड : रंगराजन समितीने केलेल्या शिफारसी साखर उद्योगास भरभराटीला आणणाऱ्या असून, असा निर्णय झाल्यास साखर उद्योगावर असणारी ठराविक लोकांची मक्तेदारी संपुष्टात येईल, असा विश्वास व्यक्त करीत आता केंद्र व राज्यात भाजपचीच सत्ता असल्याने शासनाने साखर उद्योग खुला करीत अंतराची अट काढल्यास शिवाजी केन हा गूळ पावडर, खांडसरी साखर याबरोबर साखर निर्मितीदेखील करणारा राज्यातील पहिला साखर कारखाना असेल, असे प्रतिपादन यशवंत उद्योग समूहाचे संस्थापक आ. शिवाजीराव नाईक यांनी केले.
शिवाजी केन प्रोसेसर्स लि. या उसावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य रणधीर नाईक, सम्राट महाडिक, माजी सदस्य अभिजित पाटील, मानसिंग बँकेचे जे. के. बापू पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, शिरटेकर, यशवंत ग्लुकोजचे उपाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, सत्यजित नाईक, अभिजित नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. पी. चौगुले, सौ. सुनंदा नाईक, सौ. राजेश्वरी नाईक, सौ. वेदांतिका नाईक, सौ. देवयानी नाईक उपस्थित हाते. आमदार नाईक म्हणाले की, शिवाजी केन हा सध्या १००० मे. टन ऊस गाळप करणारा कारखाना असून, यामधून गूळ पावडर, खांडसरी साखर उत्पादन करणारा हा पहिला कारखाना आहे. यापुढील काळात केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तेत असल्यामुळे पूर्वीच्या साखरसम्राटांनी घातलेल्या जाचक अटी रद्द होऊन काही वर्षांत शिवाजी केन पूर्ण क्षमतेने उत्पादन करेल. साखर सम्राटांचा शेतकऱ्यांचा पैसा इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून जमा करून काही गावात हाच पैसा विकासाच्या नावाखाली खर्च करण्याचा उद्योग सुरू आहे. कारखान्याचा कारभार काटामारी व वशिलेबाजीला थारा न देता पारदर्शकपणे चालविला जाईल. येत्या दोन वर्षांत वाकुर्डे बुद्रुक योजना पूर्ण केली जाईल. त्याचबरोबर चांदोली प्रकल्पातील सर्व प्रश्न सोडवले जातील. येत्या काही वर्षांत वाळवा तालुक्यात नवीन प्रकल्प उभा करू, असे आश्वासन त्यांनी दिले. (वार्ताहर)