कोल्हापुर-मुंबई 'वंदे भारत एक्स्प्रेस' सुरू होणार, प्रवाशांचा वेळ वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 03:56 PM2023-08-14T15:56:46+5:302023-08-14T15:57:11+5:30
मिरज, सांगलीतील प्रवाशांचीही सोय होणार
मिरज : मुंबई ते कोल्हापूर या दोन शहरांदरम्यान राज्यातील पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत ही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मध्य रेल्वेची तयारी सुरू आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई ते कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान ५१८ किलाेमीटर अंतर जलद पार करण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते कोल्हापूर दरम्यान दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा व मिरज जंक्शन स्थानकात थांबेल. सध्या मुंबई व कोल्हापूर दरम्यान महालक्ष्मी व कोयना एक्स्प्रेस या दोन गाड्यांना हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ११ ते १२ तास लागतात. मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारतला केवळ सात तास लागणार असल्याने या दोन शहरात प्रवासाचा वेळ ४ ते ५ तासांनी कमी होणार आहे.
पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम यावर्षी वेळेत पूर्ण झाले नसल्याने पुढील वर्षी मार्चपर्यत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुहेरीकरण पूर्ण होईपर्यंत या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यास अडचण असल्याने ही एक्स्प्रेस अद्याप सुरू झालेली नाही. मात्र, आता दोन महिन्यांत वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची रेल्वेची तयारी सुरू आहे. यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. या एक्स्प्रेसमुळे मिरज, सांगलीतील प्रवाशांचीही सोय होणार आहे.