आटपाडीत उद्यापासून मध्यवर्ती युवा महोत्सव, तीन जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 12:49 PM2022-10-15T12:49:56+5:302022-10-15T12:50:22+5:30
रविवारी सकाळी साडे नऊ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन
आटपाडी : आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात दि. १६ ते १८ ऑक्टोबर अखेर शिवाजी विद्यापीठाच्या ४२ वा मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. सांगली, सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती संयोजक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय लोंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, शिवाजी विद्यापीठ आणि श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने संयुक्त विद्यमाने आयोजन केले आहे. सध्या दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा मध्यवर्ती युवा महोत्सव महाविद्यालयामध्ये आयोजित केला आहे.
रविवारी सकाळी साडे नऊ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, शिवाजी विद्यापीठचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव, तहसीलदार बी. एस. माने, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.