बारावीनंतर व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी जुलैमध्ये सीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:30+5:302021-06-09T04:32:30+5:30

सांगली : बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या केंद्रीय प्रवेश परीक्षा (सीईटी) जुलैमध्ये होतील, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागेल, अशी माहिती ...

CET in July for business courses after 12th | बारावीनंतर व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी जुलैमध्ये सीईटी

बारावीनंतर व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी जुलैमध्ये सीईटी

Next

सांगली : बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या केंद्रीय प्रवेश परीक्षा (सीईटी) जुलैमध्ये होतील, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे दिली. निकाल जादा लागल्यास जागा वाढवण्याचीही तयारी आहे, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्यावतीने विविध शासकीय रुग्णालयांना १४ व्हेंटिलेटरचे वाटप सामंत यांच्या हस्ते झाले, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले की, कुलगुरुंसोबत आजच ऑनलाईन चर्चा केली. सर्व परीक्षांचे निकाल महिन्याभरात लावण्याची सूचना केली आहे. कोरोनातील मूल्यांकनामुळे विद्यार्थ्यांना नोकरीत कोणतीही समस्या येणार नाही. बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या केंद्रीय प्रवेश परीक्षा (सीईटी) जुलैमध्ये होतील, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागेल. पदविका (डिप्लोमा) अभियांत्रिकी प्रवेशासाठी पाच लाख विद्यार्थ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न आहे. त्यातून गतवर्षीपेक्षा १५ ते १७ टक्के प्रवेश वाढतील, अशी अपेक्षा आहे. डिप्लोमाचे प्रवेश दहावीच्या गुणांवरच होतील. त्यासाठी प्रवेश परीक्षा असणार नाही. व्यावसायिक संधी असणारे अभ्यासक्रमदेखील तंत्रशिक्षण परिषद सुरू करणार आहे. प्राध्यापकांच्या ३०७४ जागा रिक्त आहेत. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापर्यंत त्या भरल्या जातील.

चौकट

आचारसंहिता लागल्यावर सांगेन

सामंत म्हणाले की, कोरोनामध्ये विरोधकांकडून राजकारण सुरू आहे. पण मुख्यमंत्र्यांनी आम्हांला संयमाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर सारे काही सांगेन. कोरोनामध्ये कोणी राजकारण केले, कोणी पैसे खाल्ले याचा खुलासा करेन.

चौकट

राज्यपालांविषयी राग नाही

राज्यपालांविषयी मनात कितीही राग असला तरी तो व्यक्त करून चालणार नाही. ते घटनात्मक पद असल्याने आदर राखलाच पाहिजे. शिवसेनेची बाळासाहेबांपासून ही पंरपरा आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये धुसफूस नसून ते जिवंतपणाचे लक्षण आहे.

चौकट

केंद्रीय पथकाकडून कुणकेश्वराचे दर्शन आणि माशांवर ताव

तौक्ते वादळानंतर प्रधानमंत्र्यांनी गुजरातला हजार कोटी दिले, तसे कोकणासाठीही ५०० कोटी दिले तर समाधान मानेन. पण वादळानंतर २० दिवसांनी केंद्राचे पथक आले. कुणकेश्वराचे दर्शन घेऊन आणि नदीतल्या माशांवर ताव मारून गेेले. जखमांवर त्यांनी मीठ चोळले, असे सामंत म्हणाले.

चौकट

नाणार प्रकल्प होणार नाही

सामंत म्हणाले की, नाणार प्रकल्प होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. याचा विश्वास वाटल्यानेच कोकणातील ७३ पैकी ७१ ग्रामपंचायतीत ग्रामस्थांनी शिवसेनेला सत्ता दिली. नाणार पटट्ट्यातील ११ ग्रामपंचायतीही मिळाल्या. प्रकल्प होऊ नये अशीच या गावांची इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांनी हा विषय संपवला आहे. नारायण राणेंना टीका करण्याशिवाय काम नाही, पण दखल कोणाची घ्यायची हेदेखील ठरवले पाहिजे.

चौकट

सिव्हील हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन मशीन

सांगली, मिरज शहर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात. त्यामुळे तेथे अधिकाधिक सुविधा मिळाल्या पाहिजेत. सांगलीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन मशीन घेण्याच्या सूचना सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.

चौकट

सांगलीत सीटी स्कॅनिंगची यंत्रणा

शिवसेनेतर्फे जिल्ह्याला १४ व्हेन्टिलेटर्स देण्यात आले. इस्लामपूर व खानापूर तालुक्यातील रुग्णालयांना प्रत्येकी तीन, तासगाव, कवठेमहांकाळ, सांगली व मिरज रुग्णालयांना प्रत्येकी दोन देण्यात आले. सांगलीतील शासकीय रुग्णालयांत सीटी स्कॅनिंग यंत्रणा उपलब्ध करण्याची मागणी सामंत यांच्याकडे करण्यात आली होती. तशी सूचना त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिली. चौधरी यांनी यासंदर्भात पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करु असे सांगितले.

Web Title: CET in July for business courses after 12th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.