चडचण टोळीतील गुंड पोलिस चकमकीत ठार, उपनिरीक्षक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 09:39 PM2017-10-30T21:39:24+5:302017-10-30T21:39:40+5:30
महाराष्ट्रासह कर्नाटकात गुन्हेगारी कारवायांनी दहशत प्रस्थापित केलेल्या बहुचर्चित विजापूर जिल्ह्यातील चडचण टोळीचा गुंड धर्मराज मल्लिकार्जुन चडचण (वय ३४) हा पोलिसांच्या चकमकीत ठार झाला.
उमदी - महाराष्ट्रासह कर्नाटकात गुन्हेगारी कारवायांनी दहशत प्रस्थापित केलेल्या बहुचर्चित विजापूर जिल्ह्यातील चडचण टोळीचा गुंड धर्मराज मल्लिकार्जुन चडचण (वय ३४) हा पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उमदीपासून चार किलोमीटर अंतरावरील कोकणगाव येथे सोमवारी सकाळी ही थरारक घटना घडली. या चकमकीत चडचण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गोपाळ हळ्ळूर हेही गोळी लागल्याने जखमी झाले आहेत.
गेल्या महिन्यात चडचण पोलिसांनी पिस्तूल तस्करीच्या ‘रॅकेट’चा पर्दाफाश केला. त्यावेळी पंचवीस पिस्तूल जप्त केली आहेत. याचा तपास उपनिरीक्षक गोपाळ हळ्ळूर करीत आहेत. तपासात या ‘रॅकेट’चे मूळ ‘कनेक्शन’ उत्तर प्रदेशमध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटकेतील संशयितांनी चडचण टोळीचा सदस्य धर्मराज चडचण यालाही पिस्तूल विकल्याची कबुली दिली. गेल्या दोन दिवसांपासून धर्मराजचा शोध सुरु होता. तो कोकणगाव येथे आश्रयाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर, गोपाळ हळ्ळूर यांचे पथक सोमवारी सकाळी सहा वाजता धर्मराजला पकडण्यासाठी कोकणगाव येथे दाखल झाले.
पथकाने धर्मराजला ताब्यात घेऊन तिथेच त्याची चौकशी सुरु ठेवली. यावेळी त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादातून धर्मराज व त्याच्या साथीदारांनी हळ्ळूर यांच्या पथकावर गोळीबार सुरु केला. हळ्ळूर यांनीही स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. धर्मराजच्या छातीत दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. हळ्ळूर यांनाही दोन गोळ्या लागल्याने ते जखमी झाले. या दोघांना तातडीने विजापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पण उपचार सुरु असताना धर्मराजचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून धर्मराजचे कोकणगाव येथे वास्तव्य वाढले होते. अधुन-मधून तो सातत्याने या गावात येत असे, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. त्याच्या संरक्षणासाठी त्याच्यासोबत नेहमी दहा ते बारा साथीदार असायचे. पण पोलिस चकमकीवेळी हे सर्व साथीदार गायब झाले आहेत.
गंभीर गुन्हे
चडचण टोळी गेल्या अनेक वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. या टोळीविरुद्ध महाराष्टÑ आणि कर्नाटक पोलिसात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, खंडणीसह गंभीर गुन्हे नोंद आहेत. १९९७ पर्यंत या टोळीची महाराष्टÑ-कर्नाटक सीमेवर प्रचंड दहशत होती. पोलिस अधिकारीही स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगूनच उमदीचा दौरा करीत असत. या टोळीचा म्होरक्या श्रीशैल चडचण याचाही काही वर्षापूर्वी उमदी (ता. जत) येथे पोलिस चकमकीत मृत्यू झाला होता.