प्रभाग सभापतीसाठी पालिकेत रस्सीखेच
By admin | Published: April 11, 2016 11:04 PM2016-04-11T23:04:06+5:302016-04-12T00:39:15+5:30
१८ एप्रिल रोजी निवडी : राष्ट्रवादीची भूमिका निर्णायकी; शनिवारी अर्ज दाखल होणार
सांगली : महापालिकेच्या चार प्रभाग समित्यांच्या सभापतींची १८ रोजी निवड होणार आहे. या पदांसाठी सत्ताधारी काँग्रेसमधील मदनभाऊ गट व उपमहापौर गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधकांना हातीशी धरून जास्तीत जास्त सभापतीपदे आपल्या गटाच्या पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समिती सदस्यांच्या बैठकीत सभापती पदांची निवड होईल. त्यासाठी १६ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. सध्या चार प्रभाग समित्यांपैकी तीन सभापतीपदे काँग्रेसकडे, तर एक सभापतीपद स्वाभिमानी आघाडीकडे आहे. गेल्यावेळी काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीने सभापती निवडीत आघाडी केली होती. आता मात्र पालिकेतील राजकीय चित्र पालटले आहे. काँग्रेसमध्येच मदनभाऊ व उपमहापौर असे दोन गट पडले आहेत. उपमहापौर गटाने स्वाभिमानी आघाडीशी दोस्ताना वाढविला आहे. प्रभाग सभापती पदासाठी दोन्ही गट एकत्र येऊन मदनभाऊ गटाला शह देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
प्रभाग समिती एकमध्ये काँग्रेसचे प्राबल्य आहे. या समितीत मदनभाऊ गटाचे ५, उपमहापौर गटाचे ४, स्वाभिमानीचे ३ व राष्ट्रवादीचे ५ सदस्य आहेत. या प्रभागात उपमहापौर गट व स्वाभिमानीचे संख्याबळ सात आहे. मदनभाऊ व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली, तर उपमहापौर गटाला शह बसू शकतो. प्रभाग समिती दोनमध्ये मदनभाऊ गटाचे ८, उपमहापौर गटाचे २, स्वाभिमानीचे ५, तर राष्ट्रवादीचे ७ सदस्य आहेत. स्वाभिमानीच्या पाच सदस्यांपैकी २ सदस्य हे भाजपचे आहेत. ते सध्या तरी उपमहापौर गटासोबत नाहीत. त्यामुळे या प्रभागात मदनभाऊ गटाला वर्चस्वाची संधी आहे.
प्रभाग समिती तीनमध्ये राष्ट्रवादीची सदस्यसंख्या अधिक आहे. राष्ट्रवादीचे ७, मदनभाऊ गटाचे ५, उपमहापौर गटाचे ३, तर स्वाभिमानीचे २ सदस्य आहेत. सध्या हा प्रभाग स्वाभिमानी आघाडीकडे आहे. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कांचन भंडारी यांना सभापती पदाची लॉटरी लागू शकते. त्यासाठी त्यांना मदनभाऊ गटाची साथ घ्यावी लागेल. उपमहापौर व स्वाभिमानीला सभापतीपद मिळू नये, अशी मोर्चेबांधणी सुरू आहे.
प्रभाग चारमध्ये काँग्रेसचे एकहाती वर्चस्व आहे. इथे उपमहापौर गटाचे दोन व स्वाभिमानीचा एक सदस्य असून तो भाजपचा आहे. तसेच मदनभाऊ गटाकडे १२ सदस्य आहेत. त्यामुळे सर्व विरोधक एकत्र झाले तरी, मदनभाऊ गटाला धोका नाही. गेली दोन वर्षे सभापतीपद सांभाळणाऱ्या मालन हुलवान यांनाच पुन्हा संधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. सभापती पदासाठी इच्छुकांची संख्या पाहता, कुणाला संधी मिळते, याची उत्सुकता लागली आहे. (प्रतिनिधी)
जयश्रीतार्इंचा निर्णय
प्रभाग समिती सभापती पदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. पदाचा अंतिम निर्णय जयश्रीताई मदनभाऊ पाटील याच घेणार आहेत. त्यांच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.