विद्युत सहाय्यकावर चाकूहल्ला, सांगलीतल घटना : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 03:58 PM2018-08-28T15:58:56+5:302018-08-28T16:02:39+5:30
घरातील वीज पुरवठा सुरु करण्यावरुन महावितरणच्या सांगलीतील खणभाग शहर कार्यालयातील विद्युत सहाय्यक श्रेयस प्रविणकुमार शहा (वय २२, रा. किसान चौक, सांगलीवाडी) यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला.
सांगली : घरातील वीज पुरवठा सुरु करण्यावरुन महावितरणच्या सांगलीतील खणभाग शहर कार्यालयातील विद्युत सहाय्यक श्रेयस प्रविणकुमार शहा (वय २२, रा. किसान चौक, सांगलीवाडी) यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी साहील मुल्ला व त्याच्या दोन अनोळखी साथीदाराविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जखमी शहा यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांच्या नाकाला व कपाळाला दुखापत झाली आहे. ते २०१७ पासून महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक म्हणून सेवेत आहेत. सोमवारी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले होते. सायंकाळी मकान गल्लीतील अल्लाबक्ष अमीन मुल्ला यांच्या घरातील वीज बंद असल्याची तक्रार आली.
शहा हे लाईन हेल्पर प्रसाद व्हसवाडे यांना घेऊन दुरुस्तीसाठी गेले होते. विजेच्या खांबावरुन घरातील इलेक्ट्रीक मोटारला सप्लाय नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे शहा यांनी मुल्ला यांना आता विजेच्या खांबावरील दिवे सुरु झाले असल्याने काम करता येणार नाही. उद्या सकाळी काम करुन वीज सुरु केली जाईल, असे सांगितले. त्यानंतर ते खणभागातील कार्यालयात येऊन बसले.
मुुल्ला यांनी पुन्हा कायालयात संपर्क साधून खांबावर जाळ सुरु असल्याचे सांगितले. शहा हे तातडीने सात ते आठ कर्मचाऱ्यांना घेऊन गेले. या भागातील वीज पुरवठा बंद करुन ते परत आले. रात्री नऊ वाजता संशयित साहिल मुल्ला व त्याचे दोन साथीदार श्रेयस शहा कुठे आहे? अशी चौकशी करीत कार्यालयात आले.
शहा त्यांच्यासमोर गेले. त्यावेळी मुल्लाने आमच्या घरातील वीज आता लगेच सुरु कर, असे म्हणाला. शहा यांनी विजेच्या खांबावर दुरुस्ती करावी लागणार असल्याचे सांगितले. यातून दोघांत वाद झाला. मुल्लाने खिशातील चाकू काढून थेट शहा यांच्या नाकावर व कपाळावर मारला. त्याच्या एका साथीदाराने विटांनी छातावर मारहाण केली, तर दुसऱ्याने शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
हा प्रकार कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केली. शहा तेथून पळून कार्यालयात जाऊन बसले. रात्री उशिरा त्यांना टिंबर एरियातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पोलिसांनी शहा यांचा जबाब नोंदवून घेऊन साहिल मुल्लासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अजून कोणाला अटक करण्यात आलेली नाही.
कर्मचाऱ्यांची निदर्शने
शहा यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयितांना तातडीने अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या खणभागातील कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने केली. या हल्ल्याचा निषेध करुन जोरदार घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यापुढे कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्यास खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.