Sangli: शक्तिपीठविरोधात मणेराजुरी येथे येत्या सोमवारी चक्का जाम आंदोलन, विधिमंडळावर मोर्चाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 01:31 PM2024-12-10T13:31:34+5:302024-12-10T13:31:55+5:30
कवलापूर येथील बैठकीत निर्णय, बायका-मुलांसह मोर्चा काढणार
सांगली : शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्गसांगली जिल्ह्यातून रद्दच करावा यासाठी सोमवारी (दि. १६) विजापूर- गुहागर राष्ट्रीय महामार्गावर मणेराजुरी (ता. तासगाव) येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी केले.
महामार्गासंदर्भात कवलापूर (ता. मिरज) येथे रविवारी सायंकाळी बाधित शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी घनश्याम नलावडे, शरद पवार गव्हाण, भूषण गुरव, विष्णू सावंत, गजानन सावंत, वामन कदम, शिवाजी शिंदे, राहुल जमदाडे, शेरखान पठाण, विकास मोरे, दत्तात्रय बेडगे, प्रकाश टाकले, मधुकर नलावडे, बाळासाहेब लांडगे, सोनू कुंभार, आदी शेतकरी उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाबाबत पावसाळी अधिवेशनात बोलताना मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चेअंतीच निर्णय घेऊ, असे विधान केले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळीही शक्तिपीठ लादणार नसल्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. पण, आता निवडणुका संपताच पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गाला सांगलीपर्यंत विरोध नसल्याचा दावा केला आहे. पण, त्यांची माहिती चुकीची आहे.
शक्तिपीठविरोधी लढ्याची सुरुवात सांगली जिल्ह्यातूनच झाली आहे. सध्या पूर्ण झालेल्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अत्यंत तुरळक वाहतूक असताना नव्याने समांतर महामार्गाची गरज नसल्याचे आम्ही वारंवार सांगत आहोत. महामार्गामुळे हजारो एकर बागायती शेती उद्ध्वस्त होणार आहे. अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. नदीकाठावरील गावांवर महापुराचे संकट गडद होणार आहे. महामार्ग उंचावरून जाणार असल्याने भराव पडेल, त्यामुळे शेतामध्ये पाणी साचून कित्येक एकर शेती नापीक होणार आहे. त्याामुळे आम्ही महामार्ग होऊ देणार नाही.
बायकामुलांसह मोर्चा काढणार
दिगंबर कांबळे म्हणाले, महामार्गबाधित शेतकरी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली बायका-मुलांसह विधिमंडळावर मोर्चा काढतील. तसा निर्णय कवलापूर येथील बैठकीत झाला.