Sangli: दुष्काळ मुक्तीसाठी जत तालुक्यात चक्काजाम आंदोलन करणार, विलासराव जगतापांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 01:33 PM2024-02-03T13:33:18+5:302024-02-03T13:33:36+5:30
जत : जत पूर्व भागातील वंचित असणाऱ्या ६५ गावांसाठी असलेल्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता देऊन टेंडर काढावे, ...
जत : जत पूर्व भागातील वंचित असणाऱ्या ६५ गावांसाठी असलेल्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता देऊन टेंडर काढावे, तसेच टेंभू योजनेत समाविष्ट असलेल्या चार गावांतील काम सुरू करावे, अन्यथा १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून दुष्काळमुक्त स्वराज्यासाठी जत तालुक्यात रास्ता रोको करण्याचा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला.
शुक्रवारी विस्तारित म्हैसाळ योजनेची निविदा काढावी, या मागणीसाठी विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रांत कार्यालयासमोर सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यावेळी विस्तारित योजनेसाठी रास्ता रोकोचा इशारा दिला. यावेळी माजी सभापती सुरेश शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब, सरदार पाटील, आकाराम मासाळ, रवींद्र सावंत, महादेव अंकलगी, माजी नगरसेवक मोहन कुलकर्णी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, मूळ योजनेसाठी १ हजार ९०० कोटी मंजूर करण्यात आले. यातील पहिल्या टप्प्यासाठी ९०० कोटी देण्यात आले. याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र वंचित असणाऱ्या ६५ गावांना जाणाऱ्या योजनेच्या कामाचा पत्ताच नाही. वंचित असणाऱ्या गावांना न्याय देण्यासाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे. याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. याची जाणीव करून देण्यासाठी टप्प्याटप्याने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. आज लाक्षणिक उपोषण झाले. शासनाने दखल न घेतल्यास १९ फेब्रुवारीला महामार्गासह प्रत्येक गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रास्ता रोको करण्यात येईल.
प्रकाश जमदाडे म्हणाले, सध्या ३७ गावात प्यायला पाणी नाही याची खंत आहे. शासनाने लवकरच विस्तारितचे टेंडर काढावे. तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी येईपर्यंत आम्ही लढा उभा करू.
यावेळी राम्मान्ना जीवानावर, सुनील बागडे, विक्रम ढोणे, रमेश जगताप, चंद्रकांत गुडडोडगी, आण्णा भिसे, संग्राम जगताप, सलीम गवंडी, नीलकंठ संती, इम्रान गवंडी, तुकाराम माळी, युवराज निकम, युवराज भोसले, श्रीकांत पाटील, सोमनिंग बोरामणी, चिदानंद चौगुले, कृष्णा कोळी उपस्थित होते.