शिराळा तालुक्यात पुन्हा मुंबई, पुणेकरांमुळे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:27 AM2021-03-26T04:27:20+5:302021-03-26T04:27:20+5:30
शिराळा : शिराळा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून तालुक्यात येणारे मुंबईकर हे प्रशासनास पुन्हा एकदा आव्हान ठरणार आहेत. सध्या ...
शिराळा : शिराळा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून तालुक्यात येणारे मुंबईकर हे प्रशासनास पुन्हा एकदा आव्हान ठरणार आहेत. सध्या जे नागरिक आले आहेत त्यातील काहींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रत्येक मुंबईकरांची कोरोना टेस्ट सक्तीची करणे व संस्था विलगिकरण करणे आवश्यक आहे.
गत लॉकडाऊनवेळी ४० हजारांपेक्षा जास्त नागरिक मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून तालुक्यात आले होते. त्यावेळी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. बाहेरून आलेले अनेक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. आता जरी यात्रा आदींवर निर्बंध आले असले तरी ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात हे नागरिक येत आहेत. काही दिवसांपूर्वी येळापूर येथे आलेल्या ५६ वर्षीय पुरुषाचे निधन झाले व त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता तसेच आताही काही गावांत मुंबईहून आलेले नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
आता प्रशासनाने इतर ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध घालणे आवश्यक आहे. मुंबई , पुणे आदी ठिकाणांहून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी सक्तीची करणे तसेच या नागरिकांना संस्था विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा एकदा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.