भाजपच्या नेत्यांसमोर पदे वाटपाचे आव्हान : रयत विकास आघाडीमुळे सत्तेचे गणित जमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 10:59 PM2019-12-24T22:59:48+5:302019-12-24T23:00:17+5:30
देशमुख यांनी बाजी मारून पावणेतीन वर्षे अध्यक्षपद मिळविले. त्यावेळी रयत विकास आघाडीचे चार, शिवसेनेचे तीन, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक अशा दहा सदस्यांनी पाठिंबा दिला होता. शिवसेनेला उपाध्यक्षपद, तर रयत विकास आघाडीला महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद मिळाले होते.
अशोक डोंबाळे ।
सांगली : रयत विकास आघाडीच्या पाठिंब्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपचे गणित जमणार आहे. शिवसेना, घोरपडे गटही भाजपबरोबरच राहणार असल्याची चिन्हे आहेत. भाजपची सत्ता कायम राहणार तरी, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समितीच्या चार सभापती निवडीवरून संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. मित्रपक्षांना संधी देण्याबरोबरच तासगाव, पलूस, मिरज, आटपाडी, जत तालुक्यांना पदे वाटपात भाजप कसा समतोल राखणार, याकडे सदस्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण गटासाठी असल्यामुळे संग्रामसिंह देशमुख, शिवाजी डोंगरे, डी. के. पाटील स्पर्धेत होते.
देशमुख यांनी बाजी मारून पावणेतीन वर्षे अध्यक्षपद मिळविले. त्यावेळी रयत विकास आघाडीचे चार, शिवसेनेचे तीन, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाचे दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक अशा दहा सदस्यांनी पाठिंबा दिला होता. शिवसेनेला उपाध्यक्षपद, तर रयत विकास आघाडीला महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद मिळाले होते. घोरपडे गटाला संधी मिळाली नसल्यामुळे त्यांनी यावेळी सभापती पदावर दावा केला आहे. या गटाची समजूत काढणे, हे भाजपच्या नेत्यांसमोर मोठे आव्हान आहे. पहिल्या अडीच वर्षासाठी शिवसेनेच्या सुहास बाबर यांना राष्ट्रवादी व काँग्रेसने अध्यक्षपदाचा प्रस्ताव देऊनही, त्यांनी तो धुडकावून लावला होता. बाबर यांनी भाजपला पाठिंबा देऊन उपाध्यक्ष पदावर समाधान मानले होते. सध्या रयत विकास आघाडीच्या चार सदस्यांमुळे भाजपचे बहुमत होत आहे. मात्र अडचणीच्या काळात बाबर गटाने मदत केली असल्यामुळे त्यांना डावलणे भाजपला अडचणीचे आहे.
आता अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित असून, अनेक इच्छुक आहेत. भाजपच्या शांता कनुंजे (तडसर), अश्विनी पाटील (दुधोंडी), सरिता कोरबू (आरग), शोभा कांबळे (समडोळी) व प्राजक्ता कोरे (म्हैसाळ) दावेदार आहेत. यापैकी सध्या तरी अश्विनी पाटील, सरिता कोरबू आणि प्राजक्ता कोरे यांचा दावा प्रबळ आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाला पहिली अडीच वर्षे संधी दिली असल्यामुळे अश्विनी पाटील यांचे नाव मागे पडण्याची शक्यता आहे.
मिरज तालुक्याने अध्यक्षपदावर दावा केल्यास सरिता कोरबू, प्राजक्ता कोरे यांची नावे पुढे येणार आहेत. यामध्ये खासदार संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ यांची भूमिका महत्त्वाची आहे. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे, डी. के. काका पाटील हे पूर्वी अध्यक्षपदाचे दावेदार होते. त्यांना यावेळी संधी द्यावीच लागणार आहे.
डोंगरे यांचे सभापतीपद निश्चित असून त्यांनी बांधकाम व अर्थ समितीवर दावा केल्याची चर्चा आहे. असे झाले तर मिरज तालुक्याला दोन पदे जाणार आहेत. रयत विकास आघाडीकडून महाडिक गटाला एक आणि तासगाव व जत तालुक्यास प्रत्येकी एक असे ठरले, तर पाच पदांचे वाटप होणार आहे. खानापूरचे शिवसेनेचे तीन सदस्य असून त्यांना एक पद कसे देणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. घोरपडे गटाला मागील पदाधिकारी निवडीवेळी संधी देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. ते आश्वासन कसे पाळणार, असाही सवाल उपस्थित होत आहे.
आटपाडी तालुक्यात भाजपचे चार सदस्य असल्यामुळे तेथील अरुण बालटे यांनी सभापती पदावर दावा केला आहे. सदस्या अश्विनी पाटील अध्यक्षपदाच्या दावेदार असल्यामुळे, किमान सभापतीपद द्यावे लागणार आहे. या सदस्यांची समजूत काढताना भाजप नेत्यांची दमछाक होणार आहे. मित्रपक्षांची समजूत काढण्याबरोबरच सर्व तालुक्यांचा समतोलही राखावा लागणार आहे.