भाजपच्या आमदारांसमोर इच्छुकांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:22 AM2019-08-28T00:22:58+5:302019-08-28T00:23:02+5:30

सांगली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजप इच्छुकांच्या मुलाखतींचा पहिला राऊंड पूर्ण झाला. शक्तिप्रदर्शन टाळत इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली. ...

Challenge of aspirants in front of BJP MLAs | भाजपच्या आमदारांसमोर इच्छुकांचे आव्हान

भाजपच्या आमदारांसमोर इच्छुकांचे आव्हान

Next

सांगली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजप इच्छुकांच्या मुलाखतींचा पहिला राऊंड पूर्ण झाला. शक्तिप्रदर्शन टाळत इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली. विद्यमान आमदारांसमोरच इच्छुकांनी आव्हान उभे केले आहे. त्यात सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासमोर माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे, शिराळ्यातून शिवाजीराव नाईक यांच्यासमोर सम्राट महाडिक यांनी शड्डू ठोकला आहे. जतचे आमदार विलासराव जगताप यांच्यापुढे तर सर्वाधिक नऊ इच्छुकांचे आव्हान आहे.
अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. तत्पूर्वी भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत कोणताही लवाजमा न आणता इच्छुकांनी मुलाखती द्याव्यात, दुसऱ्या उमेदवारांची उणीदुणी काढू नयेत, स्वत: सक्षम कसे आहोत याचा लेखाजोखा मांडण्याच्या सूचना देण्यात आल्या. पक्षाची आचारसंहिताही वाचून दाखविण्यात आली. त्यानंतर दुपारी दोन वाजता जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर मुलाखतीला सुरूवात झाली. इच्छुक आणि मोजक्या समर्थकांचीच यावेळी गर्दी होती. मंत्री निलंगेकर यांनी प्रत्येक इच्छुकाशी स्वतंत्रपणे चर्चा केली व त्यांची मते जाणून घेतली.
मिरजेतून सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्यासह माजी नगरसेविका शुभांगी देवमाने इच्छुक आहेत. इस्लामपूर मतदारसंघातून भाजपच्यावतीने निशिकांत पाटील, भीमराव माने, विक्रम पाटील, वैभव शिंदे, स्वरुप पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली. यावेळीही गटबाजी दिसून आली. काही इच्छुकांनी, आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, पण दुसºयाला नको, अशी भूमिका घेतल्याची चर्चा मुलाखतस्थळी होती. पलूस कडेगावमधून जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राजाराम गरूड यांनी, तर खानापूरमधून शिवाजी मोहिते, स्नेहजित पोतदार, शंकर मोहिते, प्रताप पाटील, धीरज पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली. हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून तिथे विद्यमान आमदार अनिल बाबर आहेत.
शिराळ्यातून विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासमोर सम्राट महाडिक यांनी आव्हान उभे केले आहे. महाडिक यांनीही या मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली. त्यांच्यासह कौस्तुभ मिरजकर यांनीही मुलाखत दिली.
जतमध्ये सर्वाधिक नऊजण इच्छुक आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. डॉ. रवींद्र आरळी, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती तम्मनगौडा रवी-पाटील, प्रकाश जमदाडे, शिवाजीराव ताड, चंद्रकांत गुड्डोडगी, अ‍ॅड. प्रभाकर जाधव, अ‍ॅड. नानासाहेब गडदे, सुनील वाली यांनी जगताप यांना आव्हान दिले आहे.
खासदारांच्या सौभाग्यवतीही : निवडणुकीसाठी इच्छुक
तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघातून खासदारांच्या सौभाग्यवतीही इच्छुक आहेत. त्यामुळे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे. खासदार संजयकाका पाटील समर्थकांनी मंगळवारी त्यांच्या पत्नी ज्योतीताई पाटील यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली. त्यामुळे पाटील विरुद्ध घोरपडे असा संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.

सांगलीतही चुरस
सांगली मतदार संघातून आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह माजी आमदार दिनकर पाटील, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर आणि जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे, जय ऊर्फ बाळासाहेब पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली.

पक्षासोबतच राहतील : पाटील-निलंगेकर
विधानसभेसाठी उमेदवारी मागण्यात काहीच गैर नाही. प्रत्येकाची भावना आपण समजून घेतली आहे. या मुलाखतीचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सोपविणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे कार्यकर्ते सज्ज असून युतीच्या सर्व जागा निश्चित जिंकू, असा विश्वास मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. इच्छुकांची संख्या अधिक असली तरी, सर्वजण एकाच दिशेने जात आहेत. त्यांनी पक्षाच्या निर्णयासोबत राहण्याची ग्वाही दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
नाईक अनुपस्थित, महाडिकांचे आव्हान
शिराळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक हे मंगळवारी मुलाखतीला गैरहजर होते. पण तेही या मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांच्यासमोर सम्राट महाडिक यांनी आव्हान उभे केले आहे. महाडिक यांनी मंत्री निलंगेकर यांच्याकडे पक्षप्रवेशासह उमेदवारीची मागणी केली. यावेळी त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले. राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक ३१ आॅगस्टला भाजपप्रवेश करणार आहेत. त्यांच्यासमवेत सम्राट महाडिक हेही भाजपप्रवेश करणार असल्याची चर्चा मुलाखतस्थळी होती.

Web Title: Challenge of aspirants in front of BJP MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.