मार्च २०२० पर्यंत ‘टेंभू’च्या पूर्णत्वाचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:55 PM2018-12-21T23:55:13+5:302018-12-21T23:55:17+5:30
प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश असणाऱ्या, परंतु अद्याप सिंचनाच्या लाभापासून वंचित असणाºया ...
प्रताप महाडिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश असणाऱ्या, परंतु अद्याप सिंचनाच्या लाभापासून वंचित असणाºया व सध्या दुष्काळाने होरपळत असणाºया भागातील शेतकºयांना योजनेच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा आहे. आता या योजनेच्या ४ हजार ८८ कोटी ९४ लाख रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रकल्प अहवालास शासनमान्यता मिळाली आहे. त्यामुळे योजनेसाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु आता मार्च २०२० पर्यंत या योजनेच्या पूर्णत्वाचे आव्हान शासन आणि प्रशासनासमोर आहे.
द्वितीय सुधारित प्रकल्प अहवालाच्या मान्यतेमुळे टेंभू योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील कºहाड, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, अशा एकंदरीत ७ तालुक्यांतील २४० गावांमधील ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्रास योजनेचे पाणी मिळणार आहे. आतापर्यंत योजनेवर १ हजार ९८४ कोटी ८८ हजार इतका खर्च झाला आहे. चालूवर्षी २०१८-२०१९ मध्ये टेंभू योजनेला बळीराजा योजनेतून ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. यापैकी १०० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित ४०० कोटींचा निधी लवकरच मिळणार आहे. पुढीलवर्षी २०१९-२० मध्ये ७०० कोटींचा निधी मिळणार आहे. असा एकंदरीत ३ हजार १८४ कोटी ८८ लाख खर्च योजनेच्या कामांसाठी होणार आहे. उर्वरित ९ हजार ४० कोटी ६ लाख इतका इतर अनुषंगिक खर्च होणार आहे. यामुळे टेंभू योजना ४ हजार ८८ कोटी ९४ लाखांची झाली आहे.
चालूवर्षी प्राप्त निधीतून टप्पा क्र. ५ कार्यान्वित होण्यास मदत होणार आहे. टेंभूसह ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनांची कामे अपूर्ण आहेत. यामुळे कृष्णा खोरेच्या वाट्याचे पाणी कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांमध्ये जात आहे. हे पाणी सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागात आणले पाहिजे. यासाठी अपूर्ण कामे मार्च २०२० पर्यंतच्या मुदतीत पूर्ण करून लाभक्षेत्राची तहान भागविण्याचे आव्हान राज्यकर्त्यांसमोर उभे आहे.
वंचित भागात टेंभू योजनेच्या मुख्य कालव्याची खुदाई तसेच वितरिकांची कामे अपूर्ण आहेत. बहुतांशी ठिकाणी मुख्य कालव्याचे अस्तरीकरण झालेले नाही. ही सर्व कामे मुदतीत पूर्ण करून उपवितरिकेऐवजी बंदिस्त पाईपलाईनमधून शेतीसाठी पाणी देण्याचे आव्हान आहे.
तासगाव तालुक्यातील विसापूर-पुणदी योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या योजनेअंतर्गत एकूण ३५० कि.मी.चे कालवे आहेत. त्यापैकी २७० कि.मी.पर्यंतच्या कालव्याची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ८० कि.मी. लांबीच्या दरम्यान येणारे लाभक्षेत्र योजनेच्या पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. ही कामे बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत प्राप्त होणाºया निधीतून पूर्ण होण्यास मदत होणार आहे.