Lok Sabha Election 2019 भाजप-‘स्वाभिमानी’समोर वंचित आघाडीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:20 PM2019-04-11T23:20:16+5:302019-04-11T23:20:35+5:30
दिलीप मोहिते । लोकमत न्यूज नेटवर्क विटा : पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून २००९ ला सांगली मतदारसंघात समाविष्ट झालेल्या खानापूर विधानसभा ...
दिलीप मोहिते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून २००९ ला सांगली मतदारसंघात समाविष्ट झालेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे, तर कॉँग्रेस-राष्टÑवादी व स्वाभिमानी आघाडीचे विशाल पाटील यांची ‘बॅट’ही मतदारसंघात फिरत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीने खानापूर मतदारसंघात आव्हान उभे केले आहे.
खानापूर विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांचा मोठा गट आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत आ. बाबर कॉँग्रेसचे प्रतीक पाटील यांच्या प्रचारात उतरले होते. आता भाजप-शिवसेना युती असल्याने युतीधर्म पाळून यांनी भाजप उमेदवार संजय पाटील यांच्या पाठीशी फौज उभी केली आहे. त्यातच आटपाडीचे नेते तानाजी पाटील यांनीही खा. पाटील गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पडळकर यांनी भाजप व स्वाभिमानीसमोर आव्हान उभे केले आहे. आटपाडी, खानापूर या दोन तालुक्यात पडळकर समर्थक संख्या उल्लेखनीय आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत हातात कमळ घेतलेले कॉँग्रेसचे माजी आ. सदाशिवराव पाटील यांचे काही कार्यकर्ते आणि राष्टÑवादीचे सर्व कार्यकर्ते आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात उतरले आहेत. सदाशिवराव पाटील यांच्या संपूर्ण गटाचा निवडणुकीविषयीचा निर्णय येत्या दोन दिवसात होणार आहे. गेल्या सहा महिन्यात याठिकाणची समीकरणे गतीने बदलली आहेत. राजकीय शत्रुत्वाच्या जागी मैत्री आणि मैत्रीच्या जागी रुसवा, असे बदलते रंग या विधानसभा मतदारसंघात दिसत आहेत. त्याचे या निवडणुकीवर काय परिणाम होणार, याची चर्चाही येथील नागरिकांत रंगली आहे.
युती । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?
भाजप-शिवसेना युतीमुळे आ. अनिल बाबर यांची ताकद भाजप उमेदवाराला मिळाली आहे. त्यातच आटपाडीचे शिवसेना नेते तानाजी पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. खासदारांचा विट्यातील गटही सक्रिय झाला आहे.
युती । वीक पॉर्इंटस् काय आहेत?
यशवंत कारखान्यामुळे खासदार पाटील व आ. बाबर गटात वाद होता. तो आता मिटल्यामुळे काही महिन्यापूर्वी खासदारांसोबत असलेला माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा गट भाजपपासून दुरावला आहे.
आघाडी । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?
संजयकाका व पडळकर यांच्यातील मैत्रीची जागा संघर्षाने घेतल्याने भाजपची मतविभागणी होण्याची चिन्हे आहेत. त्यातच सदाशिवराव पाटील गटाच्या मदतीचा फायदा विटा शहरासह मतदारसंघात ‘स्वाभिमानी’ला होणार आहे.
आघाडी । वीक पॉर्इंटस् काय आहेत?
या मतदारसंघात कॉँग्रेसमध्ये गटबाजी आहे. माजी आ. सदाशिवराव पाटील व कदम कॉँग्रेसचा वाद आजही चर्चेत आहे. त्यामुळे सदाशिवराव पाटील समर्थक गटाने भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही.
मागच्या निवडणुकीत़़़
२०१४ मध्ये झालेल्या खानापूर-आटपाडी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनिल बाबर यांना ७२,८४९ मते, तर कॉँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांना ५३,०५२ मते मिळाली. १९,७९७ मतांनी बाबर निवडून आले होते.