भोसेत काँग्रेससमोर अस्तित्वाचे आव्हान

By admin | Published: January 9, 2017 10:59 PM2017-01-09T22:59:02+5:302017-01-09T22:59:02+5:30

जिल्ह्याच्या राजकारणाचे पडसाद उमटणार : आरक्षणामुळे प्रस्थापितांचा घरातील अथवा समर्थक महिलांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न

Challenge of existence before Congress in Bhoset | भोसेत काँग्रेससमोर अस्तित्वाचे आव्हान

भोसेत काँग्रेससमोर अस्तित्वाचे आव्हान

Next

अण्णा खोत ल्ल मालगाव
मिरज तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद गट खुल्या गटातील महिलांसाठी व सोनी पंचायत समिती गण इतर मागास पुरुष प्रवर्गासाठी, तर भोसे गण मागासवर्गीय पुरुषासाठी राखीव झाला आहे. यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
जिल्हा परिषद गट महिलांसाठी आरक्षित असल्याने स्थानिक नेत्यांचे घरातील अथवा समर्थक महिलांना निवडणुकीत उतरविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप अशा तिरंगी लढतीचे संकेत असले तरी, बदलत्या राजकीय घडामोडी, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची राष्ट्रवादीशी जवळीक व काँग्रेसमधील गटांतर्गत वाद यामुळे काँग्रेसला अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आहे.
येथे काँग्रेसप्रणित मदन पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे गट सक्रिय आहेत. पूर्वी येथे घोरपडेप्रणित विकास आघाडीचे वातावरण होते. सोनी गावातही घोरपडे गटाचे वर्चस्व होते. मात्र बाजार समितीचे संचालक दिनकर पाटील यांनी घोरपडे यांच्याशी फारकत घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे वसंतदादा घराण्याच्या गटांना बळ मिळाले.
सध्या घोरपडे गटाची धुरा जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र माळी यांच्याकडे आहे. मागीलवेळी काँग्रेस व राष्ट्रवादीत काट्याची टक्कर झाली. सोनी व भोसे गणांतून काँग्रेसचे माजी सभापती सुभाष पाटील व अलका ढोबळे विजयी झाले. काँग्रेसने दोन्ही गण जिंकले, मात्र राष्ट्रवादीचे राजेंद्र माळी यांनी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचा पराभव केला होता.
आता घोरपडे घोरपडे भाजपमध्ये असले तरी, खा. संजय पाटील यांच्याशी त्यांचे जमत नाही. बाजार समितीच्या सभापती निवडीवरुन माजी मंत्री पतंगराव कदम व मदन पाटील गटही त्यांच्यापासून दुरावला आहे. त्यांनी उघड भूमिका स्पष्ट केली नसली तरी, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील व ते एकत्रित विकास कामांचे नारळ फोडू लागल्याने, घोरपडे पुन्हा राष्ट्रवादीला साथ देण्याची शक्यता आहे.
वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. घोरपडे गट व राष्ट्रवादीने स्थानिक आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय घेतल्यास, त्याचा फटका काँग्रेसला बसणार आहे. बाजार समितीच्या सभापती निवडीत पतंगराव कदम व मदन पाटील गटाने घोरपडे व विशाल पाटील यांना डावलले. त्याचे पडसाद पंचायत समितीच्या उपसभापती निवडीत उमटले. कदम व पाटील गटाने दिनकर पाटील यांचे समर्थक चार्ली ढोबळे यांच्या पत्नी अलका ढोबळे यांचे उपसभापती पदासाठी सुचविलेले नाव डावलून घोरपडे व विशाल पाटील गटाने म्हैसाळच्या जयश्री कबुरे यांना उपसभापती केले. हीच रणनीती पुढे दिसणार आहे.
भोसे गट महिलांसाठी राखीव असल्याने नेत्यांनी पत्नी अथवा समर्थक महिलांसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सोनीतून बाजार समितीचे संचालक दिनकर पाटील यांच्या पत्नी संगीता पाटील, माजी उपसरपंच प्रमिला चव्हाण, आसावरी मुळीक, भोसेतून वैशाली मनोज पाटील, अनिता कदम, कमल पाटील, मीनाक्षी शीतल पाटील, निर्मला उत्तम हराळे यांची नावे चर्चेत आहेत.
सोनीचे वसंतदादा कारखान्याचे माजी संचालक राहुल पाटील यांनी घरात उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ते सध्या भाजपमध्ये आहेत. भोसे पंचायत समिती गण मागासवर्गीय पुरुषासाठी राखीव असल्याने कळंबीचे राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार, भोसेतील कृष्णा कांबळे, अरुण कांबळे व सिध्देवाडीचे सुरेश कुरणे यांची नावे चर्चेत आहेत. सोनी गण इतर मागास पुरुषासाठी (ओबीसी) राखीव आहे. येथे सोनीचे रिंगराव जाधव, शिवसेनेचे सुरेश नरुटे, विजय गुरव इच्छुक आहेत. पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील, महावीर खोत, मोहन खरात, विकास कदम, मनोज पाटील, शीतल पाटील, नेमिनाथ चौगुले, सोनीचे राहुल पाटील यांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत.

Web Title: Challenge of existence before Congress in Bhoset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.