मानसिंगराव गटाच्या सत्तेला आमदारांचे आव्हान
By admin | Published: July 5, 2016 11:46 PM2016-07-05T23:46:18+5:302016-07-06T00:15:05+5:30
शिराळा नगरपंचायतिचे संभाव्य चित्र
विकास शहा-- शिराळा शिराळा ग्रामपंचायतीची स्थापना १२ डिसेंबर १९४० रोजी झाली. ग्रामपंचायत अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना १६ मार्च २०१६ रोजी ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासूनच शिराळा ग्रामपंचायतीवर नाईक गटाची सर्वात जास्त सत्ता होती, ती अगदी शेवटपर्यंत टिकली. ग्रामपंचायत बरखास्त होताना माजी आमदार नाईक-देशमुख यांची निर्विवाद सत्ता होती. ग्रामपंचायतीत १७ पैकी राष्ट्रवादीचे ११, काँग्रेसचे ५, तर आमदार शिवाजीराव नाईक गटाचा एकच सदस्य होता.
आमदार शिवाजीराव नाईक यांनी १९९५ पासून लोकप्रतिनिधी असताना, शिराळा बायपास, पोलिस ठाणे इमारत, न्यायालय इमारत, तहसील कार्यालय सभागृहाची उभारणी केली, तर माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आमदारकीच्या काळात शिराळा शहराचा ब वर्ग पर्यटन क्षेत्रात समावेश करण्यात यश मिळविले. यामुळे मोठा निधी या शहरात आला. यातून शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण, गटारी अशी जवळपास २.२५ कोटीची कामे झाली. तसेच ७.५० कोटींची शिराळा पाणीपुरवठा योजना मार्गी लागली. एसटी बसस्थानक, प्रशासकीय इमारत, पंचायत समिती इमारत, एसटी बसस्थानक ते पंचायत समिती फूटपाथ, अंबामाता मंदिराचा संपूर्ण कायापालट केला. या चार-पाच वर्षांत शिराळा शहरात मोठा विकास झाला. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड आहे. काँग्रेसचे सत्यजित यांची साथ राष्ट्रवादीला असल्याने या ठिकाणी नाईक-देशमुख गटाची ताकद मोठी आहे.
आगामी नगरपंचायत निवडणुकीत या आघाडीस शह देण्यासाठी आमदार नाईक गट (भाजप), शिवसेना, जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक गट हे गट एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विश्वास साखर कारखान्याचे संचालक रणजितसिंह नाईक गटाची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे.
निधीच्या कमतरतेमुळे शिराळासारख्या मोठ्या शहरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कारभार करताना मर्यादा येत होत्या. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट, स्वच्छता अशी कामे करताना प्रशासनाची तारांबळ उडत होती. तरीही योग्य नियोजन करुन सोमवारचा बाजार झाला की, त्याचदिवशी रात्री १ ते २ वाजेपर्यंत संपूर्ण परिसराची स्वच्छता, त्या कचऱ्याची विल्हेवाट, शिराळा शहराला वेळेत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न बहुतांशी यशस्वी झाला.
शिराळा नगरपंचायतीसाठी ही पहिलीच निवडणूक होत असल्याने पहिले नगरसेवक कोण, पहिला नगराध्यक्ष कोण, यासाठी मोठी चर्चा सुरू आहे. मानसिंगराव नाईक गट, देशमुख गटाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी चढाओढ आहे.
इच्छुकांकडून सुरक्षित प्रभागाचा शोध
आरक्षणामुळे काही उमेदवारांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे हे नेते आरक्षणाला सुरक्षित तसेच शेजारच्या प्रभागात उमेदवारी मिळते का? यासाठी प्रयत्नशील आहेत. आतापासूनच त्यासाठी नेतेमंडळींकडे पाठपुरावा करताना दिसत आहेत. पहिल्या नगरपंचायतीत आपण ‘नगरसेवक’ व्हायचेच, यासाठी अनेकांची धडपड चालू आहे.