ओसवाल गटास पोरवाल यांचे आव्हान

By Admin | Published: June 5, 2016 11:59 PM2016-06-05T23:59:40+5:302016-06-06T00:45:38+5:30

आगामी पालिका निवडणूक : नगरसेवक रमेश पोरवाल यांच्या स्मृतींना उजाळा

Challenge of Oswal Group Porwal | ओसवाल गटास पोरवाल यांचे आव्हान

ओसवाल गटास पोरवाल यांचे आव्हान

googlenewsNext

अशोक पाटील -- इस्लामपूर पालिका निवडणुकीत व्यापारी वर्गातून राष्ट्रवादीचे रमेश पोरवाल, तर विरोधी गटातून एल. एन. शहा यांच्यातील लढती चांगल्याच गाजल्या आहेत. गत निवडणुकीत या दोघांची परंपरा मोडीत निघाली आहे. विरोधी गटातून कपिल ओसवाल यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बाजी मारली. येणाऱ्या निवडणुकीत कपिल ओसवाल व त्यांचे बंधू अमित ओसवाल निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याची चर्चा आहे, तर रमेश पोरवाल यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू बाळासाहेब पोरवाल ओसवाल गु्रपला आव्हान देण्याच्या तयारीला लागले आहेत.
गत निवडणुकीत ३ प्रभागांचा एक प्रभाग, अशी रचना होती. त्यामुळे रमेश पोरवाल विरुध्द एल. एन. शहा या पारंपरिक लढतीला पूर्णविराम मिळाला. त्यामुळे अ‍ॅड. चिमण डांगे यांच्याविरोधात एल. एन. शहा यांना निवडणूक लढवावी लागली. मुस्लिम मतांच्या ताकदीवर डांगे यांनी ही निवडणूक जिंकली, तर नव्यानेच महाडिक शक्तीच्या ताकदीवर विरोधी गटातून कपिल ओसवाल यांनी बाजी मारून पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्या घरातील उमेदवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांचे पानिपत केले. याचा वचपा काढण्यासाठी आतापासूनच राष्ट्रवादीतून ओसवाल बंधंूविरोधात बाळासाहेब पोरवाल यांच्यारूपाने फिल्डिंग लावली जात असल्याची चर्चा आहे.
कपिल ओसवाल यांनी आपल्या प्रभागातील सर्वसामान्य नागरिक, तसेच युवक मंडळांना वेळोवेळी मदत करुन आपली ताकद वाढवली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत स्वत: कपिल ओसवाल आणि त्यांचे बंधू अमित ओसवाल हे महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रणांगणात उतरतील.
पारंपरिक लढतीतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रमेश पोरवाल यांचे निधन झाल्याने आमदार जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला होता. रमेश पोरवाल यांची मुले सध्या तरी राजकारणात येण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यांनी स्वत:चा व्यवसाय वाढविणेच पसंद केले आहे. परंतु पोरवाल यांचे बंधू बाळासाहेब पोरवाल यांनी मात्र निवडणुकीची चांगलीच तयारी सुरु केली आहे.
प्रभाग फेररचना आणि आरक्षण यावरच उमेदवारी निश्चित असली तरी, ओसवाल बंधू ज्या प्रभागात लढतील, त्यांच्याविरोधातच बाळासाहेब पोरवाल राष्ट्रवादीतून लढणार असल्याची चर्चा व्यापारी वर्गातून आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत ओसवाल आणि पोरवाल बंधू ज्या प्रभागात लढतील, तेथील लढत लक्षवेधी होणार, हे मात्र निश्चित.

मतदारांची : पाचही बोटे तुपात..!
आगामी निवडणुकीत ज्या प्रभागात एल. एन. शहा, कपिल ओसवाल आणि बाळासाहेब पोरवाल हे उमेदवार असतील, त्या प्रभागात मोठी चुरस असणार आहे. तीनही गटांची ताकद मोठी असल्याने, मते पदरात पाडून घेण्यासाठी मोठी कसरत असणार आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तीनही गटांना तयारीनिशी तोडीस तोड काम करावे लागणार आहे.


अजूनही आमच्या विरोधकांना जाग आलेली नाही. आरक्षण सोडत महत्त्वाची आहे. खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्व मान्य करुन विरोधकांनी एकत्र यावे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीविरोधात सक्षम उमेदवार देऊन प्रत्येक प्रभागात एकास एक लढतीचा आमचा प्रयत्न आहे.
- एल. एन. शहा,
माजी नगरसेवक.


आमचे नेते जयंत पाटील यांच्या आदेशाचा सन्मान करुन आपण रणांगणात उतरणार आहे. सध्या तरी शिवनगर परिसरातील प्रभागातून निवडणुकीसाठी आपली तयारी सुरु आहे. परंतु पक्ष ज्या प्रभागातून निवडणूक लढवण्यास सांगेल, तेथून लढण्यास माझी तयारी राहील.
- बाळासाहेब पोरवाल,
इस्लामपूर.

Web Title: Challenge of Oswal Group Porwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.