सहा लाखांहून अधिक ज्येष्ठांच्या लसीकरणाचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:34 AM2021-02-27T04:34:00+5:302021-02-27T04:34:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील सहा लाखांहून ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरण १ मार्चपासून केले जाणार आहे, मात्र त्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील सहा लाखांहून ज्येष्ठ नागरिकांचे कोरोना लसीकरण १ मार्चपासून केले जाणार आहे, मात्र त्यासाठी कोणत्याही मार्गदर्शक सूचना शासनाकडून अद्याप आलेल्या नाहीत. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या लसीकरणाचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे असेल.
ज्येष्ठ नागरिकांची लसीकरणासाठी पोर्टलवर नोंदणी ही खूपच मोठी डोकेदुखी प्रशासनापुढे आहे. नोंदणीसाठीचे कोविन ॲप सर्वसामान्यांसाठी अद्याप खुले झालेले नाही. ते शनिवारी किंवा रविवारी खुले करावे लागेल. यासंदर्भात शुक्रवारी अधिका-यांची राज्यस्तरीय ऑनलाइन बैठक झाली.
नोंदणीनंतर ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी कॉल येतील. तूर्त आरोग्य विभागाकडे त्याची नेमकी सज्जता अद्याप नाही. जादा डोसदेखील आलेले नाहीत. सध्या जिल्हाभरात ३६ लसीकरण केंद्रे आहेत. ज्येष्ठांसाठी ती वाढवावी लागतील. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात सोय करावी लागेल. ज्येष्ठांचे विविध विकार, ॲलर्जी यांची नोंद घेऊन लसीकरणाचा निर्णय घ्यावा लागेल. यापूर्वी आरोग्य कर्मचारी व शासकीय फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण करतेवेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पोर्टल अत्यंत मंद गतीने सुरू राहिल्याने दररोज १०० टक्के लसीकरण होऊ शकले नाही. २९ हजार जणांची नोंदणी झालेली असताना २० हजार जणांनाच लस देणे शक्य झाले. आता ज्येष्ठ नागरिकांच्या निमित्ताने लाखो लोकांना लस देणे सोपे काम खचितच नसेल.
चौकट
मिरज तालुक्यात सर्वाधिक ज्येष्ठ
मिरज तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. विशेषत: सांगली व मिरज शहरांत दीड लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र मोहीम हाती घ्यावी लागेल. त्याचा मोठा भार महापालिकेवर राहील. सध्या महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांत लसीकरण सुरू आहे. ज्येष्ठांची मोठी संख्या पाहता महापालिकेला मोठी तयारी करावी लागणार आहे. अपॉइंटमेंट देऊन केंद्रावर बोलवावे लागेल. लसीकरण ऐच्छिक असल्याने सक्ती करता येणार नाही, त्यामुळे १०० टक्के लसीकरणासाठी बरीच खटपट करावी लागणार आहे.
पॉइंटर्स
६० ते ७० वयोगटांतील नागरिक - २५००००
७१ ते ८० वयोगटांतील नागरिक - १८००००
८१ ते ९० वयोगटांतील नागरिक - १३००००
९१ पेक्षा जास्त वयोगटांतील नागरिक - ७००००
तालुकानिहाय लसीकरण केंद्रांची संख्या
मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, पलूस, आटपाडी, खानापूर, कडेगाव, शिराळा, वाळवा
कोट
मी लस घेणार!
लसीबद्दल अफवाच जास्त पसरविल्या जात आहेत. सरकारने लोकांच्या आरोग्याच्या काळजीनेच प्रचंड मोठा खर्च करून लस उपलब्ध केली आहे, या स्थितीत लसीकरणाकडे पाठ फिरविणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. ज्येष्ठांनी लस घेतलीच पाहिजे.
- सुमती नाईक, मिरज
ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या पूर्वआजारांची माहिती डॉक्टरांना देऊन लस घेतली पाहिजे. लस घेणे म्हणजे स्वत:बरोबरच समाजालाही सुरक्षित ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे ही सर्वांचीच व्यक्तिगत आणि सामाजिक जबाबदारी आहे.
- एस.एन. कुलकर्णी, मिरज
कोरोनासाठी सध्या तरी लस घेणे हा एकमेव उपाय आहे. कोरोनाचा फैलाव पुन्हा सुरू झाल्याने लसीकरण गांभीर्याने केले पाहिजे. सरकार विनाशुल्क लस देत आहे, त्यामुळे ज्येष्ठांनी लसीकरणासाठी पुढे यायला हवे. मीदेखील घेणार आहे.
- रंगराव देसाई, लाडेगाव, ता. वाळवा