राष्ट्रवादी पक्षाला विकास आघाडीकडून आव्हान
By admin | Published: January 23, 2017 12:01 AM2017-01-23T00:01:22+5:302017-01-23T00:01:22+5:30
इच्छुकांच्या दांड्या गूल : वाटेगावला महिला आरक्षण, सर्व पक्षांच्या नेत्यांकडून सक्षम महिलांचा शोध
धोंडीराम कुंभार, मानाजी धुमाळ ल्ल वाटेगाव, रेठरेधरण
वाळवा तालुक्यातील वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक इच्छुकांना पुनर्रचना आणि आरक्षणामुळे यावेळी थांबावे लागणार आहे. राष्ट्रवादी, विकास आघाडी, काँग्रेसकडून सक्षम महिला उमेदवारांची शोधाशोध सुरु आहे. महिला आरक्षणामुळे इच्छुकांची संख्या कमी आहे. त्यातच प्रस्थापितांच्या घरातील महिला इच्छुक नसल्याने, स्थानिक नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.
यावेळच्या जि. प. निवडणुकीसाठी पेठ मतदार संघाची पुनर्रचना होऊन वाटेगाव गट नव्याने निर्माण झाला आहे. यामध्ये वाटेगाव व रेठरेधरण या दोन गणांचा समावेश आहे. वाटेगाव जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण खुल्या वर्गातील महिलेसाठी आरक्षित झाला आहे. रेठरेधरण पंचायत समिती गण ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित आहे. मतदार संघात १0 गावांचा समावेश झाला आहे.
राष्ट्रवादीकडून उमेदवार निवडीचे सर्व अधिकार आमदार जयंत पाटील यांच्याकडे असल्याने स्थानिक नेतेमंडळींनी वाटेगाव गटासाठी रेठरेधरण येथील राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील यांच्या पत्नी व कासेगावचे जनार्दन पाटीलकाका यांच्या भगिनी सौ. संध्या आनंदराव पाटील, वाटेगाव येथील सौ. सुवर्णा संदीप जाधव, सौ. भाग्यश्री राहुल चव्हाण, सौ. शुभांगी प्रकाश पाटील, सुनीता प्रताप ठोंबरे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेसकडून सत्यजित देशमुख यांच्या वाटेगाव येथील समर्थक सौ. उज्ज्वला जयवंत नांगरे यांचे एकमेव नाव पुढे आले आहे. विरोधी विकास आघाडीतून मंत्री सदाभाऊ खोत यांच्या स्नुषा सौ. मोहिनी सागर खोत, वाटेगाव येथील राहुल पाटील यांच्या पत्नी सोनाली पाटील, यशवंत दूध संघाचे संचालक हेमंत मुळीक यांच्या पत्नी सौ. शुभांगी मुळीक, रेठरेधरण येथील डी. के. पाटील यांच्या पत्नी सौ. वनीता पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. वाटेगाव गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. तेथे राष्ट्रवादीकडे सरपंच प्रकाश पाटील यांच्या पत्नी सौ. शुभांगी पाटील, माजी सरपंच राहुल चव्हाण यांच्या पत्नी भाग्यश्री चव्हाण, माजी सरपंच सौ. जयश्री नागनाथ जाधव, शिक्षक नेते ग. चि. ठोंबरे यांच्या स्रुषा सुनीता प्रताप ठोंबरे, के. जे. पाटील यांच्या पत्नी सुजाता पाटील यांनी पक्षाकडे मागणी केली आहे. विकास आघाडीतून संपतराव मुळीक यांच्या पत्नी अंजना मुळीक, शुभांगी हेमंत मुळीक यांच्या नावांची चर्चा आहे.
रेठरेधरण गणासाठी राष्ट्रवादीकडून विजय कवठेकर, संतोष महिंद यांची नावे चर्चेत आहेत. विरोधी विकास आघाडीतून रेठरेधरणचे ग्रा. पं. सदस्य दादासाहेब राऊत, लक्ष्मण जाधव व भाटवाडीचे उपसरपंच काशिलिंग तिवले, बाजीराव सुतार, रेठरेधरणचे शंकर महिंद (गुरुजी), पांडुरंग ऊर्फ नंदकुमार गुरव यांच्या नावांची चर्चा आहे.