खानापुरात चुरशीचा चौरंगी सामना

By admin | Published: October 1, 2014 11:24 PM2014-10-01T23:24:15+5:302014-10-02T00:10:00+5:30

राष्ट्रवादीच्या सुभाषआप्पांची बंडखोरी : मनसेही नशीब अजमावणार

Challenging the Challenge in Khanpur | खानापुरात चुरशीचा चौरंगी सामना

खानापुरात चुरशीचा चौरंगी सामना

Next

दिलीप मोहिते -- विटा--आघाडी व महायुती तुटल्याने यावेळी खानापूर विधानसभा मतदारसंघात रंगतदार लढत होत असून, कॉँग्रेसचे विद्यमान आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासह माजी आमदार अनिल बाबर (शिवसेना), आटपाडीचे अमरसिंह देशमुख (राष्ट्रवादी) आणि गोपीचंद पडळकर (भाजप) या प्रमुख चार उमेदवारांत चुरशीची लढत अपेक्षित आहे. यावेळी हातनूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे समर्थक सुभाषआप्पा पाटील यांनी बंडखोरी केली असल्याने, राष्ट्रवादीला विसापूर मंडलमध्ये फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने भक्तराज ठिगळे हेसुध्दा मैदानात उतरले आहेत. यावेळी खानापूर तालुक्यातील दोन, आटपाडी तालुक्यातील दोन असे चार तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने चुरस वाढली आहे.
खानापूर मतदारसंघात कॉँग्रेसचे सदाशिवराव पाटील गेल्या दहा वर्षांपासून प्रतिनिधीत्व करीत आहेत. २००९ च्या निवडणुकीत पाटील यांच्याविरूध्द राष्ट्रवादीच्या पाठबळावर अनिल बाबर यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकला होता. त्यावेळी आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा पाठिंबा असूनही पाटील यांनी बाबर यांचा पराभव केला होता. आता बाबर यांनी राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’ करून शिवसेनेतून उमेदवारी घेतली आहे. त्यामुळे अपवादात्मक जुने शिवसैनिक वगळता बाबर यांच्यासोबत राष्ट्रवादीत असलेले कार्यकर्ते शिवसैनिक झाले आहेत. पर्यायाने यावेळी राष्ट्रवादीच्या मतांचेच विभाजन झाल्याचे दिसून येते.
अमरसिंह देशमुख यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आटपाडीला पहिल्यांदाच पक्षाच्या तिकिटावर संधी मिळाली आहे. विट्याचे अशोकराव गायकवाड यांनी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या साक्षीने अमरसिंह देशमुख यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशमुख यांची विट्यातील शक्ती वाढणार आहे. रासपचे गोपीचंद पडळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे खा. संजय पाटील यांचे स्टार प्रचारक झाल्याचा फायदा पडळकरांना मिळाला. त्यांना भाजपने उमेदवारी दिल्याने लोकसभेला रूजलेले ‘कमळ’ चिन्ह पडळकरांच्या पदरात पडले. मोदी लाटेचा त्यांना कितपत फायदा मिळणार, याकडे नजरा लागल्या आहेत.
मतदारसंघात समाविष्ट असलेल्या विसापूर मंडलमधील हातनूरचे माजी जि. प. सदस्य सुभाषआप्पा पाटील हे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे पूर्वाश्रमीचे समर्थक आहेत. त्यांनीही रिंगणात उतरून बंडाचा झेंडा रोवला आहे. पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न झाले. परंतु, ते निवडणूक लढविण्याच्या विचारापासून बाजूला झाले नाहीत. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीमध्येच बंडखोरी झाली आहे. त्याचा फटका विसापूर मंडलमध्ये राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संपत खाडे, राजेंद्र निकम हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. दिघंचीतील राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख व रावसाहेब पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

खानापूर-आटपाडी
एकूण मतदार २,९६,०३३
नावपक्ष
सदाशिवराव पाटीलकाँग्रेस
अमरसिंह देशमुख राष्ट्रवादी
अनिल बाबर शिवसेना
गोपीचंद पडळकरभाजप
सुभाष पाटीलअपक्ष
भक्तराज ठिगळेमनसे
अ‍ॅड्. सतीश लोखंडेभाकप
संजय पुकळेबसपा
बाळू देठे बहुजन मुक्ती पार्टी
रवींद्र जाधव भा.नौ.से.प.
बाबासाहेब कदमअपक्ष
रविराज पवारअपक्ष

Web Title: Challenging the Challenge in Khanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.