इस्लामपुरात राष्ट्रवादीला आव्हान देताना काँग्रेसची दमछाक शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:31 AM2021-09-08T04:31:57+5:302021-09-08T04:31:57+5:30
पालिका लोगो लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे संख्याबळच नाही. मात्र ...
पालिका लोगो
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे संख्याबळच नाही. मात्र कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची ताकद दाखवून देऊ, असे सांगितले आहे. राज्यात महाआघाडीची सत्ता आहे. त्यामुळे येथे बलाढ्य राष्ट्रवादीला आव्हान देताना काँग्रेसची दमछाक होणार आहे.
पालिकेच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात सर्व पक्ष विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आले. शिवसेनाही त्यांच्यात सामील झाली, परंतु धनुष्यबाण चिन्ह घेऊन लढली. त्यांचे पाच नगरसेवक निवडून आले. तेव्हापासून ‘मातोश्री’वर जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांचे वजन वाढले. राज्यात महाआघाडी सत्तेवर आल्यानंतर पालिका सभागृहात शिवसेनेला सावध भूमिका घ्यावी लागत आहे.
सध्या वैभव पवार काँग्रेसचे असले, तरी त्यांना विकास आघाडीसोबतच राहावे लागते. त्यामुळे पालिकेच्या राजकारणात काँग्रेसची स्वतंत्र ताकद नाही. तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्याकडे ठराविक कार्यकर्त्यांची फळी आहे. येथील मनीषा रोटे राज्यपातळीवरील नेत्या आहेत. मात्र पालिकेच्या राजकारणात महिलांचे संघटन नाही.
जिल्हा पातळीवरून येथील काँग्रेसला कधीच ताकद मिळाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी अर्थात जयंत पाटील यांची ताकद अबाधित राहिली आहे. एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेल्या शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील यांना भाजपची वाट निवडावी लागली.
आता काँग्रेसच्या माध्यमातून विश्वजित कदम हे जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करत आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देत आहेत, मात्र राज्यात महाआघाडीची सत्ता आहे. त्यामुळे येथे बलाढ्य राष्ट्रवादीला आव्हान देताना काँग्रेसची दमछाक होणार आहे.
चौकट
पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते परततील का?
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत विश्वजित कदम यांनी ताकद पणाला लावली होती, परंतु जयंत पाटील गटानेच बाजी मारली. आता कदम थेट जयंत पाटील यांनाच आव्हान देत आहेत. त्यांची ही भूमिका कायम राहिली तरच भाजपमध्ये गेलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते त्यांचा विचार करू शकतात. त्यानंतर राजकीय संघर्षाला धार येईल.