सांगलीवाडीत चेंबर धाेकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:27 AM2021-04-24T04:27:22+5:302021-04-24T04:27:22+5:30
सांगली : सांगलीवाडीतील अमर महाराष्ट्र चौकात ड्रेनेजचे झाकन उघडेच आहे. महापालिकेने लक्ष देऊन तातडीने उघडे चेंबर बंदिस्त करावे, अशी ...
सांगली : सांगलीवाडीतील अमर महाराष्ट्र चौकात ड्रेनेजचे झाकन उघडेच आहे. महापालिकेने लक्ष देऊन तातडीने उघडे चेंबर बंदिस्त करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सावर्डेकर घर ते प्रकाश कराळे घर ते रमेश जाधव घर या दक्षिण उत्तर व पूर्व पश्चिम अशा रस्त्यावर हे चेंबर आहे. ज्येष्ठ नागरिक व मुलांसाठी ते धोक्याचे ठरत आहे. तातडीने येथील दुरुस्ती करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
————————-
दारू पिऊन गाडी चालविल्याबद्दल दंड
तासगाव : शहरात दारू पिऊन मोटारसायकल चालविल्याबद्दल न्यायालयाने नीलेश तानाजी खंबाळे (रा. तासगाव) याला साडेतीन हजार रुपये दंड केला. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी माहिती दिली. खंबाळे हा दारू पिऊन मोटारसायकल (क्र. एमएच १० डीजी ९४६४) चालवत होता. पोलिसांनी त्याच्यावर न्यायालयात खटला दाखल केला होता.
——————————-
उन्हाने शेतीची कामे मंदावली
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. पारा ३८ अंशापर्यंत पोहोचला आहे. पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. शेतीची कामे मंदावली आहेत. वाढत्या उष्णतेमुळे मजुरांनीही कामाच्या वेळेत बदल केला आहे. सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत कामाची वेळ त्यांनी निश्चित केली आहे. दुपारच्या वेळेत गावातील रस्ते ओस पडू लागले आहेत.
————————
जिल्ह्यात नदीकाठ खचू लागला
सांगली : महापूर तसेच नंतरच्या अतिवृष्टीमुळे कृष्णा तसेच व वारणाकाठची शेतजमीन आता खचू लागली आहे. अनेक ठिकाणी जमिनीचे कडेच्या कडे उन्मळून नदीपात्रात पडू लागले आहेत. त्यामुळे नदीकाठावरील शेतीला धोका निर्माण होऊ लागला आहे.
—————————
मध्यवर्ती भागातच सुविधांची प्रतीक्षा
सांगली : विजयनगरसह परिसराचा भाग सातत्याने नागरी सुविधांपासून उपेक्षित राहिला आहे. अंतर्गत खराब रस्ते, ड्रेनेज, गटारी, पिण्याचे पाणी अशा समस्या कायम आहेत. मुख्य चौकात वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढते आहे. त्याचप्रमाणे येथे उड्डाणपुलाची मागणी होत आहे.
—————————
पुलाची उंची वाढविण्याची मागणी
सांगली : वाळवा तालुक्यातील बागणी ते दुधगावदरम्यान गाव ओढ्यावरील फरशी पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे. महापूर तसेच अतिवृष्टी दरम्यान या फरशी पुलावर सातत्याने पाणी येऊन हा मार्ग बंद राहत होता. त्यामुळे वाहनचालकांना गैरसोय सहन करावी लागत होती.
——————————
वाढत्या शेतमजुरीने शेतकरी त्रस्त
सांगली : आता शेतीमधील उन्हाळी कामांनी गती घेतली आहे. मात्र, अनेक ठिकाणी शेतमजुरांकडून शेतकरीवर्गाची जादा मजुरीसाठी अडवणूक होत आहे. जादा मोबदला देऊनदेखील अपेक्षित काम होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
——————————-
कर्नाटकात रात्रीची संचारबंदी
म्हैसाळ : सध्या महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली, तरी शेजारील कर्नाटकात मात्र रुग्णसंख्येचे आकडे महाराष्ट्राच्या तुलनेने कमी आहेत. महाराष्ट्रात कडक निर्बंध, संचारबंदी व आता लॉकडाऊनकडे वाटचाल असताना कर्नाटकात मात्र तूर्तास यातील काहीही नसून केवळ रात्रीची संचारबंदी काही ठिकाणी लागू केली आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा फटका बसू नये, याकरिता कर्नाटक शासनाकडून सीमा बंद करण्यात येत आहेत.
—————————
सीमाभागात रस्ते खाेदले
म्हैसाळ : जिल्ह्यात कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांची धास्ती कर्नाटकने घेतली आहे. आता सीमा बंद करण्यामध्ये कर्नाटक सरकारने हालचाली वेगवान केल्या आहेत. काही महाराष्ट्राशी संलग्न काही गावांमध्ये मोठी चर मारून रस्ते बंद केले जात आहेत. यामुळे सीमाभागातील नागरिकांना मोठ्या अंतराचा फटका बसत आहे.
————————-