चाणक्यनीतीचा नवा डाव

By Admin | Published: January 4, 2017 11:02 PM2017-01-04T23:02:19+5:302017-01-04T23:02:19+5:30

चाणक्यनीतीचा नवा डाव

Chanakyanti's new game | चाणक्यनीतीचा नवा डाव

चाणक्यनीतीचा नवा डाव

googlenewsNext


श्रीनिवास नागे
‘इस्लामपूर नगरपालिकेतल्या जबर तडाख्यानं जयंत पाटील जमिनीवर आले असतील ना...’, असं कुचेष्टेनं म्हणणाऱ्यांचे दात त्यांच्याच घशात घालण्यासाठी जयंतरावांनी शड्डू ठोकलाय.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन नंबरचे नेते अर्थात कृषी-पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि विधानपरिषदेचं मैदान मारून आमदार झालेल्या मोहनराव कदमांना त्यांनी ‘टार्गेट’ केलंय, तर त्याचवेळी स्वाभिमानी आणि काँग्रेसचं घर फोडण्यासाठी पद्धतशीर निशाणा धरलाय. इस्लामपूर पालिकेत बसलेला हादरा नव्हता, तर किरकोळ दुखापत होती, हेही ते दाखवून देताहेत.
इस्लामपुरात जयंतरावांची सत्ता उलथवल्याची फडमारू भाषणं सुरू असताना जयंतराव हसत होते. ‘कोण म्हणतं, आमची सत्ता गेली म्हणून?.. जरा जपून...’ असं ते म्हणत होते. त्याचा प्रत्यय बुधवारी आलाच. पालिकेत राष्ट्रवादीचे १४, विरोधी विकास आघाडीचे १३, तर एक अपक्ष आहे. नगराध्यक्षपदही विकास आघाडीकडंच. त्यामुळं विकास आघाडी हुरळून गेली. मग मनातल्या मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्या आघाडीला पाणी पाजणार नाहीत, ते जयंतराव कसले! पालिकेतल्या एकमेव अपक्षाला फितवून त्यालाच उपनगराध्यक्ष केलं. विकास आघाडीचा उमेदवार पाडत अगदी सांगून-सवरून धोबीपछाड दिला.
त्यातच जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्यात. इस्लामपूर पालिकेत जयंतरावांना रोखण्यासाठी वापरलेला विरोधकांच्या एकजुटीचा ‘सक्सेस पासवर्ड’ पुन्हा वापरण्याचा मनसुबा विरोधकांचा आहे, हे लक्षात येताच जयंतरावांनी नवा ‘कार्यक्रम’ आखलाय. त्यांनी थेट सदाभाऊ खोत आणि मोहनराव कदम यांनाच ‘टार्गेट’ केलंय. कारण दोघांनी राष्ट्रवादीच्या पर्यायानं जयंतरावांच्या दिशेनं तोफगोळे सोडलेत. त्यावर भाजपच्या मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडं शिफारस करायला सदाभाऊ आपल्याला फोनवर फोन करत होते, असा बॉम्बगोळा टाकून जयंतरावांनी धमाल उडवून दिली. (ही खरी कूटनीती!) अर्थात सदाभाऊंनी असं काही केलं नसेलच, असं कुणी म्हणणारही नाही! कारण सदाभाऊंना त्यावेळी दिवसाढवळ्या पडत असलेली मंत्रिपदाची स्वप्नं, जयंतरावांचा भाजपशी असलेला दोस्ताना आणि त्यांच्या साथीदारांची सदाभाऊंशी असलेली जवळीक उसाच्या बांधावरून फिरणाऱ्या पोरासोरांनाही माहीत झालीय. (दिलीपतात्यांची साक्ष काढावी का?)
सदाभाऊ मंत्री झालेत, त्यामुळं त्यांच्या मागं-मागं करणारी आणि करू पाहणारी मंडळी या बॉम्बगोळ्यामुळं नक्कीच बिथरतील, शिवाय सदाभाऊ आणि खा. राजू शेट्टी यांच्यात तयार होत असलेलं बेबनावाचं चित्र यामुळं आणखी गडद होणार, हा जयंतरावांचा होरा. भाजप सरकारच्या धोरणांवर राजू शेट्टी जेवढं (अधूनमधून का होईना...) तोंडसुख घेतात, तेवढं सदाभाऊ बोलूच शकत नाहीत. सत्तेतल्या सदाभाऊंनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलावं यासाठी जयंतरावांनी नानाप्रकारे चुचकारलं, पण सदाभाऊ गप्पच. बोलावं तर पंचाईत, नाही बोलावं तर अडचण!
एकीकडं हे सुरू असताना जयंतरावांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार मोहनराव कदमांवर नेम धरलाय. जिल्हा परिषदेला काँग्रेसच नडणार आणि भारी पडणार, याचा अंदाज त्यांना आधीच आलाय. त्यामुळं त्यांनी काँग्रेसमधली बेदिली वाढविण्याची खेळी खेळलीय. मोहनरावांनी अलीकडं राष्ट्रवादीवर सडकून टीका सुरू केलीय. त्यात राष्ट्रवादीची संगत बिलकूल नको, असा त्यांचा सततचा आग्रह. शिवाय जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीविरोधात सर्वपक्षीय आघाडी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चारीमुंड्या चीत करत जयंतरावांचं नाक कापलंय. परिणामी जयंतराव त्यांच्यावर खार खाऊन आहेत. ‘कोणतंही झाड पाडताना फांद्या छाटून चालत नाहीत, तर त्याच्या मुळांवर घाव घालावा लागतो’, या चाणक्यनीतीनं जयंतरावांनी थेट वार सुरू केलेत. नोटांच्या जीवावर निवडून आलेल्यांची खुमखुमी उतरवण्याची भाषा करत त्यांनी मोहनरावांपेक्षा त्यांचे धाकटे बंधू पतंगराव अधिक परिपक्व असल्याचं सांगत मुळावरच घाव घातलाय.
काँग्रेसमधली गटबाजी, पतंगराव-जयंतरावांचं ‘अंडरस्टँडिंग’, त्याला असलेला मोहनरावांचा विरोध अधोरेखित करत घरात दुही माजवायची, हा विलक्षण डाव टाकलाय. असा बुद्धिभेद केवळ जयंतरावच करू जाणे!!
जाता-जाता : ‘कुणाचाही पडता काळ पाहून त्याच्या भविष्यकाळाची खिल्ली उडवू नका, कारण वेळकाळात एवढी ताकद असते की, तो कोळशाचाही हिरा बनवू शकतो’... चाणक्याच्या या नीतीवर जयंतरावांचा गाढा विश्वास असावा, म्हणूनच त्यांनी म्हटलं असावं, ‘सदाभाऊ, सत्ता कायम नसते. लक्षात ठेवा!’
ताजा कलम : मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडं शिफारस करायला सदाभाऊ आपल्याला फोन करत होते, असं जयंतरावांनी जाहीर केलं... ही भाजपशी असलेल्या सलगीची त्यांनी स्वत:हूनच दिलेली कबुली की, भाजपमध्ये त्यांच्या इशाऱ्यावर जाऊन त्यांचंच न ऐकणाऱ्यांना दिलेला इशारा..?

Web Title: Chanakyanti's new game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.