चंदन चोरट्यांचा पोलिसांवर हल्ला
By admin | Published: October 13, 2016 02:22 AM2016-10-13T02:22:21+5:302016-10-13T02:39:01+5:30
चौघांना अटक : दोघे फरारी; जिल्हा पोलिसप्रमुखांच्या बंगल्याजवळ घटना
सांगली : जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्या निवासस्थानामागील चंदनाची झाडे चोरणाऱ्या टोळीला बुधवारी पहाटे अटक करण्यात आली. पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. ही टोळी सोलापूर जिल्ह्यातील आहे. चोरट्यांनी पोलिसांवर हल्लाही केला. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी चार चोरट्यांना रंगेहात पकडण्यात यश आले, तर अन्य दोघे फरारी झाले आहेत. या टोळीकडून चारचाकी वाहनासह चार लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
अटक केलेल्यांत तानाजी हरी खराटे (वय ३२), राजू कालिदास पाखरे (वय २५), कांतिलाल उत्तम चवरे (३८, तिघे रा. पेन्नूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर), सोनू शंकर बनसोडे (२४, रा. चिंचोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) या चौघांचा समावेश आहे. इतर दोघे फरार झाले आहेत.
विश्रामबाग चौकातील पोलिस मुख्यालयाच्या परिसरात जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चंदनाची झाडे आहेत. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या निवासस्थानी बंदोबस्तासाठी असलेले पोलिस कॉन्स्टेबल दीपक तुकाराम वडेर यांना जिल्हा पोलिसप्रमुख शिंदे यांच्या निवासस्थानामागे झाडे तोडण्याचा आवाज आला. त्यांनी या परिसराची पाहणी केली, त्यावेळी सहाजण चंदनाची झाडे करवतीने कापत असल्याचे त्यांना दिसून आले. वडेर यांनी तातडीने पोलिस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. तसेच शिंदे व उपाध्याय यांच्या निवासस्थानी बंदोबस्तास असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना एकत्र केले.
नियंत्रण कक्षातील पोलिस कर्मचारी, राखीव दल व निवासस्थानाच्या बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला.
(पान १ वरून) तोपर्यंत चोरटे चंदनाची झाडे तोडून ती लाकडे घेऊन जात होते. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी एका चोरट्याने पोलिस कॉन्स्टेबल वडेर यांच्यावर करवतीने हल्ला चढविला, पण हा वार वडेर यांनी काठीने परतवून लावला. इतर दोन संशयितांनी हातातील सत्तूर व तलवारीचा धाक दाखवित जिवे मारण्याची धमकी दिली. राजू पाखरे या चोरट्याला पकडत असताना वडेर यांच्याशी हाणामारी झाली. अखेर पोलिसांनी सहापैकी चार चोरट्यांना अटक केली असून इतर दोघे सत्तूर व तलवारीचा धाक दाखून पसार झाले. चंदनाची झाडे वाहतुकीसाठी आणलेल्या मोटारीसह (एमएच १३, बीएन ४७१९) चंदनाचा ओंडका, करवत असा चार लाखांचा माल जप्त केला आहे. फरारी दोघांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. (प्रतिनिधी)
पोलिसप्रमुखांकडून दहा हजारांचे बक्षीस
फोटो : १२एसएन ३ : पोलिस कर्मचारी दीपक वडेर
पोलिस कर्मचारी दीपक वडेर यांना जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पोलिस नियंत्रण कक्षासाठी निरीक्षक, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत टोळीला जेरबंद करण्यात यश मिळविले. त्यांनाही पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले.
पाळेमुळे खणून काढू : शिंदे
या टोळीकडून आणखी किती ठिकाणी चंदन चोरी करण्यात आली आहे, याची माहिती घेतली जात आहे. या टोळीतील संशयितांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीची पाळेमुळे खणून काढून दोषींवर कडक कारवाई केली जाईल. या टोळीवर भारतीय दंडविधान संहिता व वन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेशही दिल्याचे जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.
सीमाभागात चंदनाची विक्री
चंदन चोरणाऱ्या टोळीची पोलिस निरीक्षक राजू मोरे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक बाजीराव जाधव यांनी कसून चौकशी केली. ही टोळी ठिकठिकाणी चंदनाच्या झाडांची माहिती घेऊन टेहळणी करीत असे. रात्रीच्या सुमारास झाडे तोडून चंदनाची कर्नाटक सीमा भागातील वेगवेगळ्या ठिकाणी सुगंधित अत्तर तयार करणाऱ्या कारखान्यांत चार हजार रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. या कारखान्याच्या मालकांकडून चंदनाची झाडे चोरण्यासाठी चोरट्यांना आगावू रक्कम देण्यात येत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
चोरटे-पोलिसांत हाणामारी : चंदन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी पोलिसांवर हल्ला केला. एका चोरट्याने पोलिस कर्मचारी दीपक वडेर यांच्यावर करवतीने वार केला, पण तो वार वडेर यांनी काठीने परतविला, तर राजू पाखरे या चोरट्याची वडेर यांच्याशी झटापट झाली.