संखमध्ये चंदनसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 10:34 PM2018-03-16T22:34:16+5:302018-03-16T22:34:16+5:30
सांगली : संख (ता. जत) येथील रेपगुड वस्तीवरील एका घरावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी छापा टाकून दीडशे किलो चंदनाची लाकडे व इलेक्ट्रानिक वजनकाटा असा पावणेचार लाखांचा माल जप्त केला. याप्रकरणी भिमाण्णा उर्फ तम्मा चन्नाप्पा भोसले (वय ३७) यास अटक केली आहे.
भिमाण्णा भोसले हा कर्नाटकातून चंदनाची झाडे तोडून त्याचा घरात साठा करुन विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या पथकाने रेपगुड वस्तीवरील भोसलेच्या घरावर छापा टाकला. छाप्याची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्यास पकडले. घराची झडती घेतल्यानंतर सात पोत्यांमध्ये चंदनाची लाकडे आढळून आली. दीडशे किलोचे हे चंदन आहे. चंदन विक्रीसाठी वापरण्यात येणारा इलेक्ट्रानिक वजनकाटाही जप्त केला. भोसलेविरुद्ध उमदी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्याला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिंदे, हवालदार अशोक डगळे, अमित परीट, राहूल जाधव, अझर पिरजादे, चेतन महाजन, सचिन सुर्यवंशी व किशोर काबूगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.