सांगली महापालिकेतील घोटाळ्यांची चौकशी करू : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 04:16 PM2018-08-04T16:16:14+5:302018-08-04T16:19:02+5:30
कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत यापूर्वी झालेल्या सर्वप्रकारच्या घोटाळ््यांची चौकशी आम्ही तातडीने सुरू करू. त्यात आमचे काही लोक सापडले तरीही आम्ही कारवाई करू, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.
सांगली : कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत यापूर्वी झालेल्या सर्वप्रकारच्या घोटाळ््यांची चौकशी आम्ही तातडीने सुरू करू. त्यात आमचे काही लोक सापडले तरीही आम्ही कारवाई करू, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, महापालिका निवडणुकीत आम्ही कॉँग्रेस-राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तरीही केवळ आरोपापुरते आम्ही थांबणार नाही. त्या प्रकरणांची शहानिशा करू. ज्याठिकाणी घोटाळे आढळतील त्याचवेळी कारवाईच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. त्याचबरोबर महापालिकेच्या आगामी पाच वर्षाच्या काळात भाजपच्या एखाद्या सदस्याने कोणते गैरकृत्य केले तर त्याच्यावर कारवाई करतानाही आम्ही हयगय करणार नाही.
महापालिकेतील सदस्यांवर आमचे पूर्ण नियंत्रण राहील. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमार्फत आम्ही या नगरसेवकांना प्रशिक्षणसुद्धा देणार आहोत. त्यामुळे आमचे सदस्य कारभारात कुठेही कमी पडणार नाहीत. त्याचबरोबर शासनाकडून निधीही कमी न पडू देण्याची जबाबदारी आमची राहील.
गेल्या वीस वर्षांत येथील नागरिकांनी विकासकामे पाहिलीच नाहीत. रस्ते, भूमिगत गटारी, भूमिगत विद्युत वाहिन्या, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी निचरा व्यवस्था अशा विविध प्रकारच्या कामांसाठी योजना आखण्यात येईल.
शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील. तिन्ही शहरांचा कायापालट करण्यात आम्हाला यश मिळेल. येथील व्यापार व उद्योगाला आम्ही बळ देणार आहोत. त्यासाठी एलबीटीचा प्रलंबित प्रश्न येत्या काही दिवसात तातडीने मार्गी लावण्यात येईल.
मुख्यमंत्रीच घेणार आढावा!
चंद्रकांत पाटील म्हणाले की, महापालिकेच्या नगरसेवकांचा प्रत्येक तीन महिन्याच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. त्यामुळे नगरविकास खात्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडून महापालिकेवर लक्ष राहील. येथील विकासकामांना त्यामुळे अडथळे येणार नाहीत.
आयुक्तांना समज देणार
महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्या कारभाराबद्दल यापूर्वी अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. भाजपच्या आमदारांनीही तक्रार केली होती. त्यामुळे सुरुवातीला आम्ही त्यांना समज देऊ. त्यानंतरही योग्य पद्धतीने कारभार झाला नाही, तर त्यांच्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे पाटील म्हणाले.