चांदोली धरण शंभर टक्के भरले, ४५०० क्युसेक विसर्ग सुरू; तिस-या दिवशीही अतिवृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 05:14 PM2022-09-13T17:14:52+5:302022-09-13T17:15:30+5:30
धरणातून वारणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदी दुधडी भरून वाहत आहे.
गंगाराम पाटील
वारणावती : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. सोमवार सकाळी आठ ते आज, मंगळवार सकाळी आठ पर्यंत चोवीस तासांत ९२ मिलीमीटर तर दिवसभरात १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून १० हजार ७७३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले.
शिराळा तालुक्यातील पश्चिम विभागात पंधरा दिवसानंतर १० सप्टेंबर पासून पावसाने दमदार हजेरी लावली. ११ सप्टेंबर पासून तीन दिवस अतिवृष्टी होत आहे. यामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पाणलोट क्षेत्रातून सध्या १० हजार ७७३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणात सध्या ३४.४० टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण शंभर टक्के भरेल आहे. गतवर्षी २१ सप्टेंबरला धरण शंभर टक्के भरले होते. यंदा आठ दिवस अगोदर च शंभर टक्के भरले आहे.
गेल्या चोवीस तासांत ९२ व दिवसभरात १० मिलीमीटर सह एकूण २५८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाचा जलविद्युत प्रकल्प केंद्राकडून ५०० चा विसर्ग वाढवून १५०० क्युसेक करण्यात आला. तर तब्बल १५ दिवसानंतर मंगळवार पासून धरणाच्या वक्राकार दरवाजातून तीन हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. एकूण ४५०० क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू केल्याने नदी दुधडी भरून वाहत आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास पुन्हा कोणत्याही क्षणी विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठावरील गावानी सतर्कता बाळगण्याचा इशारा धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.