चांदोली धरण ९९.७२ टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:32 AM2021-09-09T04:32:45+5:302021-09-09T04:32:45+5:30
वारणावती : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. पाणलोट क्षेत्रातून ११ हजार २८९ क्युसेक पाण्याची ...
वारणावती : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. पाणलोट क्षेत्रातून ११ हजार २८९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असतानाच बुधवारी धरणातील विसर्ग वाढविला. धरणात सध्या ३४.३१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मंगळवारी रात्री आठ ते बुधवारी सकाळी आठपर्यंत ५० मिलीमीटर व दिवसभरात पाच मिलीमीटरसह आतापर्यंत एकूण २६५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. पाणलोट क्षेत्रातून ११,२८९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या या धरणात बुधवारी सकाळी आठ वाजता ३४.१७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. दुपारी चार वाजता ३४.३१ टीएमसी पाणीसाठा झाला. त्याची टक्केवारी ९९.७२ अशी आहे. धरण भरले आहे. चौदा दिवसांनंतर विसर्ग सुरू केला आहे. बुधवार दुपारनंतर ३२५० क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
पावसाने असाच जोर वाढविला, तर धरणातून पुन्हा विसर्गात वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.