Chandoli Dam: चांदोली धरणात गतवर्षीपेक्षा दीड टीएमसी पाणीसाठा कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 05:34 PM2022-04-18T17:34:33+5:302022-04-18T18:31:27+5:30
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही साहजिकच वाढत आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणात दीड टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
गंगाराम पाटील
वारणावती : उन्हाळी आवर्तन सुरू असल्याने चांदोली धरणातून वाकुर्डे व म्हैसाळ योजनेसाठी सध्या पाणी सोडले जात आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही साहजिकच वाढत आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणात दीड टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
सांगली, कोल्हापूर, सातारा व रत्नागिरी या चार जिल्ह्यांतील पाणलोट क्षेत्रातून पावसाळ्यात धरणात पाणी येते. राज्यातील मातीचे दोन नंबरचे धरण असून ३४.४० टीएमसी पाणीसाठवण होते. चांदोली धरणात सध्या १८.५१ टीएमसी पाणीसाठा असून यातील उपयुक्त पाणीसाठा ११.६३ टीएमसी इतका आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा १.५० टीएमसीने कमी आहे. गतवर्षी आजच्या तारखेचा उपयुक्त पाणीसाठा १२.७२ टीएमसी इतका होता.
गेल्या तीन महिन्यांतील पाण्याचा वापर लक्षात घेता १६ जानेवारी ते आजअखेर तीन महिन्यांत ११ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला साधारण सरासरी पावणेचार टीएमसी पाणी वापरले गेले आहे. १६ मार्चला धरणात उपयुक्त पाणीसाठा १६.५७ टीएमसी होता. तर आज एका महिन्यानंतर धरणातील उपयुक्त पाणीसाठा ११.६३ टीएमसी आहे. म्हणजेच गेल्या महिनाभरात ४.९४ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.
सध्या धरणातून वाकुर्डे व म्हैसाळ योजनेसाठी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे सध्या महिन्याला ५ टीएमसी वापर होताना आता किमान अर्धा ते एक टीएमसी पाणी जास्त सोडावे लागणार आहे. म्हणजेच महिन्याला किमान सहा टीएमसी पाणी लागणार आहे.
परिणामी, पुढील दोन महिन्यात म्हणजेच १६ जूनपर्यंत धरणातून किमान १२ ते १३ टीएमसी पाणी संपणार आहे. म्हणजेच थोडक्यात सध्याच्या वापराप्रमाणे पाणी वापर राहिला, तर १६ जून रोजी धरणातील उपयुक्त पाणीसाठी संपणार आहे.
सध्या धरणात पाण्याची पातळी ६०८.३० मीटर असून पाणीसाठा १८.५१ टीएमसी (५३.८० टक्के) उपयुक्त पाणीसाठा ११.६३ टीएमसी (४२.२६ टक्के) इतका असून १२१८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गेल्या तीन महिन्यांतील पाणी वापर
१६ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २.५६ टी.एम.सी.
१६ फेब्रुवारी ते १६ मार्च - ३.४८ टी.एम.सी.
१६ मार्च ते १६ एप्रिल - ४.९४ टी.एम.सी.
१६ जानेवारी ते आजअखेर तीन महिन्यांत एकूण १०.९८ टी.एम.सी. पाणी वापर