सांगलीतील चांदोली धरण चार महिन्यांपासून अंधारात, वीजवाहिनी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:31 PM2024-08-20T12:31:04+5:302024-08-20T12:31:21+5:30
ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्याने पथदिवे बंदच
आनंदा सुतार
वारणावती : शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाचे बांधकाम पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र, आजपर्यंत एकदाही धरणावरील रस्त्यांची डागडुजी केलेली नाही. धरणावरील यंत्रसामग्रीही जुनाट झाली आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचे रस्ते आहेत. त्यांची आता दुरवस्था झाली आहे.
धरणाला चार वक्राकार दरवाजे आहेत. प्रत्येक पावसाळ्यात पाणीपातळी वाढली की या दरवाजांतून पाणी सोडले जाते. हे दरवाजे उचलण्यासाठी उच्च विद्युत दाबाची आवश्यकता असते. मात्र, त्यासाठीचा ट्रान्सफॉर्मर सांडव्यापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. या अंतरामुळे विद्युतदाब कमी प्रमाणात उपलब्ध होतो. परिणामी, दरवाजे मध्येच बंद पडतात. सध्या प्रशासनाने येथे जनरेटरची व्यवस्था केली आहे. मात्र, ती व्यवस्था कायमस्वरूपी पर्याय नाही. त्यासाठी हा ट्रान्सफॉर्मर जवळच बसविणे गरजेचे आहे. ऐनवेळेला जनरेटर बंद पडला तर वक्राकार दरवाजे चालू अथवा बंद करताना व्यत्यय निर्माण होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरणावरील पथदिवे पूर्णत: बंद आहेत.
महावितरणकडून उच्च दाब (३३ केव्ही)लाइन स्वतंत्र दिली असून, मागील कित्येक महिन्यांपासून ३३ केव्ही ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने धरणावर अंधाराचे साम्राज्य असते. सुरक्षेच्या दृष्टीने धरणावर बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंदच आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर सुरक्षेसाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कसलीही व्यवस्था धरण प्रशासनाने पुरविली नसल्याने मोठा धोका आहे. महती कंपनीच्या विद्युत केंद्रातून तात्पुरत्या स्वरूपात वीज घेऊन सांगली जिल्ह्यातील सुरक्षा चौकीला रात्रीच्या वेळी अंधारातून उजेडात आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
महावितरणकडून ३३ केव्ही स्वतंत्र वीजपुरवठा केला आहे. ही लाइन धरणाच्या बांधकामावेळी टाकलेली असून, त्याच्या दुरुस्तीसाठी सध्या वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविला आहे. धरणावर स्वतंत्र जनरेटरची व्यवस्था केली असून, सध्या तो कार्यरत आहे. - गोरख पाटील, शाखा अधिकारी, वारणावती
चांदोली धरण बांधकामावेळी हजारो कामगार उपलब्ध होते. परंतु, अलीकडच्या २० ते २५ वर्षांत धरण प्रशासनाचे अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी वास्तव्यास नाहीत. त्यामुळे अंधाराबरोबरच धरणाची सुरक्षा आणि देखभाल रामभरोसेच आहे. - सावळाराम पाटील, मणदुर, ग्रामस्थ