चिंताजनक! सांगलीतील चांदोली धरणामध्ये २१ दिवसांत ३ टीएमसीने घट, २० तलाव कोरडेठाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:57 IST2025-04-11T16:56:35+5:302025-04-11T16:57:07+5:30

विकास शहा शिराळा : चांदोली (ता. शिराळा) धरणातून वीजनिर्मितीसाठी तसेच शेतीसाठी पाणी सोडल्याने पाणीसाठ्यात घट झाली आहे. तीव्र उन्हामुळे ...

Chandoli Dam in Sangli has decreased by 3 TMC in 21 days, 20 lakes have dried up | चिंताजनक! सांगलीतील चांदोली धरणामध्ये २१ दिवसांत ३ टीएमसीने घट, २० तलाव कोरडेठाक

चिंताजनक! सांगलीतील चांदोली धरणामध्ये २१ दिवसांत ३ टीएमसीने घट, २० तलाव कोरडेठाक

विकास शहा

शिराळा : चांदोली (ता. शिराळा) धरणातून वीजनिर्मितीसाठी तसेच शेतीसाठी पाणी सोडल्याने पाणीसाठ्यात घट झाली आहे. तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचा परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे. गेल्या साडेसहा महिन्यात १५ टीएमसी साठा कमी झाला आहे. तर गेल्या २१ दिवसांत ३ टीएमसीने घट झाली आहे. गतवर्षीपेक्षा हा साठा दोन टीएमसीने जादा आहे. तालुक्यातील ४९ पैकी २० पाझर तलाव एप्रिलमध्येच कोरडे पडले आहेत.

चांदोली धरणातून वीजनिर्मिती केंद्रातून कालव्यात ३२६ क्युसेकने, तर नदीत ९८९ क्यूसेकने असा एकूण १३१५ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. चांदोली धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. उपयुक्त साठा १२.४१ टीएमसी आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये तो १०.३७ टीएमसी होता. म्हणजे यावर्षी २.०४ टीएमसी साठा जास्त आहे. पण बाष्पीभवन वेगाने होत असल्याने वेगाने घट होत आहे.

मोरणा धरणातून शेतीला पाणी द्यावे, तसेच औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्यात कपात करावी, अशी मागणी होत आहे. मोरणा धरणात ३५ टक्के, गिरजवडे ५२ टक्के, करमजाई ८५ टक्के, अंत्री खुर्द २७ टक्के, शिवणी २३ टक्के, टाकवे ३३ टक्के, कार्वे २५ टक्के व रेठरे धरण ३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाझर तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. तालुक्यातील ३३० कूपनलिकांनी तळ गाठला आहे.

चांदोली धरणाची आजची स्थिती

  • क्षमता -३४.४० टीएमसी
  • आजचा पाणीसाठा - १९.२९ टीएमसी (५६.०७ टक्के)
  • उपयुक्त पाणीसाठा - १२.४१ टीएमसी (४५.०७ टक्के)
  • गत हंगामातील एकूण पाऊस - ४००१ मिलिमीटर
  • वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग - १३१५ क्यूसेक
  • कालव्यातून विसर्ग - ३२६ क्यूसेक
  • नदीपात्रात विसर्ग - ९८९ क्यूसेक


कोरडे झालेले तलाव

हातेगाव (अंबाबाईवाडी), शिरसी (गिरजवडे रस्ता), शिरसी (काळे खिंड), शिरसी (कासारदरा), पाचुंब्री, करमाळे नंबर, शिवारवाडी, भैरववाडी, निगडी जुना (कासारदरा), निगडी (खोकड दरा), इंग्रूळ, पावलेवाडी क्रमांक १ आणि २, कोंडाईवाडी क्रमांक १ आणि २, धामवडे, तडवळे वडदरा, तडवळे १, भाटशिरगाव, सावंतवाडी.

तलावांच्या बुडीत व संपादित क्षेत्रात शेतकऱ्यांनी थेट पंपाद्वारे पाणीउपसा करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल. - प्रवीण तेली जलसंपदा अधिकारी

Web Title: Chandoli Dam in Sangli has decreased by 3 TMC in 21 days, 20 lakes have dried up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.