Sangli: रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची पाण्याची मागणी, चांदोली धरणातून पहिल्या आवर्तनास सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 05:40 PM2024-11-27T17:40:53+5:302024-11-27T17:41:11+5:30
वीजनिर्मिती केंद्रातून ८३३ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग
विकास शहा
शिराळा : चांदोली धरणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सुरू करण्यात आले आहे. वीजनिर्मिती केंद्रातून ८३३ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यातील ५८३ क्यूसेकने नदी पात्रात व २५० क्यूसेकने डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. तालुक्यातील ४७ पाझर तलावात दोन टक्क्यांनी तर मध्यम प्रकल्पातील १० टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला आहे.
चांदोली धरण २८ सप्टेंबरला पूर्ण क्षमतेने भरले होते. सध्या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली आहे. या मागणीनुसार अगोदर १५० क्यूसेक व नंतर २५० क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याचबरोबर मोरणा धरणातूनही विसर्ग सुरू आहे.
लघु पाटबंधारे उपविभागांतर्गत तालुक्यात एकूण ४९ पाझर तलाव आहेत. या तलावातील पाणी साठवण क्षमता २३६.४१ दशलक्ष घन फूट इतकी आहेत, तर ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले होते. त्यामधील पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी घट होऊन सध्या २२५.९१ दशलक्ष घन फूट इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
सर्व तलावाची सिंचन क्षेत्र क्षमता १६५९ हेक्टर इतकी आहे. ११ सिमेंट नाला बंधारेही पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. यामध्ये ४.५२ दश लक्ष घन फूट पाणीसाठा उपलब्ध झाला असून यांची सिंचन क्षेत्र क्षमता ४८.९७ हेक्टर इतकी आहे. करमाळे नंबर १ व पाचुंब्री पाझर तलावाचे साठवण तलावामध्ये रूपांतर करण्याचे दुरुस्तीचे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत सुरू आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत सदर तलावात मृतसाठा शिल्लक आहे.
चांदोली धरण - पाणीसाठा ३४.१२ टीएमसी (९३.३८%)
उपयुक्त पाणीसाठा - २५.२४ टीएमसी (९१.७३%)
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडलेला एकूण पाऊस मिमीमध्ये
- पाथरपुंज येथे - ८१८६
- निवळे - ६५५०
- धनगरवाडा - ४०३२
- चांदोली धरण - ३९९१
मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा टक्क्यांमध्ये
- मोरणा - ९०
- करमजाई - ८१
- अंत्री बुद्रूक - ९३
- गिरजवडे - ९३
- शिवनी - ९२
- टाकवे - ९६
- रेठरे धरण- ९०
- कार्वे - ८५.
पाझर तलावातून थेट पंप टाकून किंवा सायफन पद्धतीने पाणी उपसा करू नये अन्यथा संबंधितावर योग्य ती कारवाई केली जाईल तरी सर्व शेतकरी बांधव, तसेच नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. त्याचप्रमाणे तालुक्यातील ११ सिमेंट बंधाऱ्यांचे दरवाजे त्वरित बसविण्याबाबत संबंधित ग्रामपंचायत व पाणी वापर संस्था यांना कळविण्यात आले आहे. - प्रवीण तेली, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, शिराळा