चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा उद्यापासून पावसाळी ब्रेक, पर्यटनासाठी बंद राहणार; पुन्हा कधी खुले होणार..
By संतोष भिसे | Published: June 14, 2024 03:59 PM2024-06-14T15:59:06+5:302024-06-14T16:00:32+5:30
आनंदा सुतार वारणावती : पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान शनिवारपासून (१५ जून) पर्यटकांसाठी बंद झाले ...
आनंदा सुतार
वारणावती : पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान शनिवारपासून (१५ जून) पर्यटकांसाठी बंद झाले आहे. चांदोली परिसरातील चांदोली धरण यापूर्वीच म्हणजे १२ जूनपासून बंद करण्यात आले आहे. आता चांदोली राष्ट्रीय उद्यानही पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत ते पर्यटनासाठी बंद राहील.
मागील साडेसात महिन्यांपासून उद्यान पर्यटकासाठी सुरु होते. दिवाळी सुट्टीतील पर्यटन, शालेय सहली व मे महिन्याच्या सुट्टीमध्ये हजारो पर्यटकांनी चांदोली धरण, अभयारण्य, गुढे पाचगणी पवनचक्की पठार पाहण्यासाठी पसंती दिली. १५ ऑक्टोबर २०२३ ते १० मे २०२४ या कालावधीत ६९०८ हून अधिक पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला. आता पावसाळा सुरु झाल्याने १५ जूनपासून उद्यान पर्यटकासाठी बंद होणार आहे.
मे महिन्यात बुद्ध पौर्णिमेला झालेल्या पाणवठ्यांवरील गणनेत अनेक प्रजातींचे प्राणी, पक्षी आढळले होते. चांदोली अभयारण्याची ही वनसंपदा अभिमानास्पद आहे. गणनेत बिबट्या, गवे, सांबर, रानकुत्री, ससे, पिसोरी / गेळा, भेकर, अस्वले, उदमांजर, माकड, साळींदर, मुंगुस, शेखरू, वाटवाघूळ, चकोत्री, रानकोंबडा, घुबड, सर्पगरुड, मोर, पर्वती कस्तुर, पांढऱ्या गालाचा कटूरगा, लाल बुडाचा बुलबुल, केसरी डोक्याचा कस्तुर, धामण, घोरपड अशा २०० हून अधिक प्राण्यांची नोंद झाली.
चांदोलीत बारा वर्षांखालील मुलांना प्रत्येकी ५० रुपये, तर प्रौढ व्यक्तीस १०० रुपये शुल्कात प्रवेश दिला जातो. १५ ऑक्टोबर २०२३ ते ९ मे २०२४ या कालावधीत ५२७९ प्रौढ व्यक्ती व १६२९ लहान मुले सहलीसाठी अभयारण्यात आली.